नागपूर : ‘फेसबुक लाईव्ह’ करत एका विवाहित तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. कृतांक सिद्धार्थ डोंगरे (२७,कुंभारे कॉलनी, कामठी) असे संबंधित तरुणाचे नाव आहे.
कृतांकचे लग्न झाले होते व तो एकत्रित कुटुंबात राहत होता. त्याची पत्नी माहेरी गेली होती तर आईदेखील बाहेरगावी होती. वडील तसेच भाऊ-बहीण हे नागसेननगर येथे असलेल्या घरी गेले होते. कृतांक घरी एकटाच होता. ४ एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर साडेबारा वाजता त्याने अचानक फेसबुक लाईव्ह सुरू केले. त्यानंतर त्याने नवीन कपडे घातले, कपाळाला टिका लावला व त्यानंतर घरच्या बेडरूममधील पंख्याला ओढणी लटकावली. त्यानंतर ‘काय म्हणता गाईज’ असे म्हणत त्याने थोडे इशारे केले व त्यानंतर कपाळावरील टिका पुसला. तसेच जवळील एका ग्लासमधील द्रव्य फेकले व मग शिलाई मशीनवर चढत त्याने गळफास लावला.
सुमारे ४१ मिनीटे हे फेसबुक लाईव्ह सुरूच होते. सकाळीच त्याच्या आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. त्याच्या आत्महत्येचे कारण समोर येऊ शकलेले नाही. या प्रकारामुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या वडिलांनी दिलेल्या सूचनेवरून नवीन कामठी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पत्नीच्या अकाऊंटवरून केले ‘लाईव्ह’
कृतांतने त्याच्या पत्नीच्या फेसबुक खात्यावरून ‘लाईव्ह’ करत आत्महत्या केली. त्याचप्रमाणे त्याने मी स्वत:च्या मर्जीने आत्महत्या करत असल्याचेदेखील पोस्ट केले. मध्यरात्र असल्याने त्याच्या संपर्कात असलेल्यांच्यादेखील हा ‘लाईव्ह’चा प्रकार लक्षात आला नाही.