नागपूर : पोलीस कोठडीतील चौकशीत तपास अधिका-यांची दिशाभूल करण्याचे तंत्र नोटा अदलाबदलीच्या धंद्यात गुंतलेल्या आरोपींनी अवलंबले आहे. त्यामुळे पोलिसांना ते दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. काही जण छाती दुखत असल्याचेही सांगून पोलिसांची चौकशी टाळत आहेत.
१ आॅगस्टला गुन्हे शाखेच्या पथकाने कोराडी रोडवरील वॉक्स कुलर चौकाजवळ राणा अपार्टमेंटमध्ये छापा टाकला होता. त्यावेळी ३०१ क्रमांकाच्या सदनिकेत प्रसन्ना पारधी हा बिल्डर ९७ लाख ५० हजार रुपयाच्या जुन्या नोटांसह पोलिसांना आढळला होता. तर, पोलीस आल्याचे पाहून सदरमधील कापड व्यापारी कुमार चुगानी, रुषी खोसला आणि त्याचे साथीदार पळून गेले होते. तेव्हापासून पोलीस त्यांचा ठिकठिकाणी शोध घेत होते. पोलिसांजवळ पळून गेलेल्या आरोपींची छायाचित्रे (सीसीटीव्ही इमेज) आणि मोबाईल नंबर होते. मात्र, त्यांनी ते नंबर बंद करून ठेवल्यामुळे पोलिसांची गोची झाली होती. तरीसुद्धा गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोली निरीक्षक सचिन लुले आणि त्यांच्या सहका-यांनी सोमवारी आणि मंगळवारी मुंबई तसेच अहमदनगरात छापेमारी करून अमित कांगने (वय ३२), नितीन नागरे (वय ३७, रा. कल्याण मुंबई), नागेश कुसकर (वय ३०, रा. डोंबीवली, मुंबई ) आणि सचिन शिंदे (वय ३२, रा. संगमनेर) या चौघांना अटक केली. बुधवारी त्यांन ा नागपुरात आणून कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना १४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. तेव्हापासून पोलीस त्यांची चौकशी करीत आहेत. मात्र, चौकशीत आरोपी दिशाभूल करणारी माहिती देत आहे.
अटकेतील या चौघांचा सूत्रधार अमित कांगणे आहे. नितीन नागरे वाहनचालक आहे. नागेश कुसकर बांधकाम व्यावसायिक असून, सचिन शिंदे शेतकरी असल्याचे सांगितले जाते.
कांगनेला ५०० आणि १०० कोटी रुपयांच्या नोटा बदलवून देण्याची हमी कुमार चुगानी आणि रुषी खोसला व त्यांच्या साथीदारांकडून मिळाल्याने तो नागपुरात आला होता. त्याने नागेश कुसकरची कार आणली होती. या कारमध्येच मोठ्या प्रमाणात नोटा होत्या.
मात्र, त्या नोटा कुणाच्या होत्या, ते सांगायला आरोपी तयार नाहीत. प्रत्येक जण विसंगत माहिती देत आहे.
कुणी छाती दुखत असल्याचे सांगून तर कुणी ओका-या आल्यासारखे करून चौकशी टाळत आहेत. त्यामुळे काळे धन बाळगणारे आणि त्या नोटा चलनातून बाद होणार असल्याचे माहित असूनही गप्प बसलेले आरोपी अजूनही अंधारातच आहेत.
वर्धेतील आरोपी स्वीच्ड आॅफ
या प्रकरणात महत्वाची भूमीका वठविणारे वर्धा येथील आरोपी डॉक्टर आणि व्यापारी फरार आहे. त्यांनी आपले मोबाईल स्वीच्ड आॅफ केल्याने त्यांना हुडकणे पोलिसांसाठी कठीण काम ठरले आहे. ते हाती लागल्यास आणखी अनेक धक्कादायक बाबी उजेडात येऊ शकतात, असा पोलिसांचा अंदाज आहे.