नागपूर : रविवार, दि. ८ मे रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘आयआयएम-नागपूर’च्या नव्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. राष्ट्रपतींच्या या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. ‘कोरोना’ नियंत्रणात असला, तरी दौऱ्यासाठी नियुक्त अधिकाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणीदेखील अनिवार्य करण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे यांनी राष्ट्रपतींच्या दौऱ्याबाबत मिनीट टू मिनीट नियोजनाचा आढावा घेतला.
या बैठकीला जिल्हाधिकारी आर. विमला, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, महसूल विभागाच्या उपायुक्त आशा पठाण, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत पाटील, स्वागत अधिकारी काटकर तसेच आयआयएम, मिहान, महानगरपालिका तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासंदर्भात सर्व राजशिष्टाचाराचे पालन करताना ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर टेस्ट करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. त्याचप्रमाणे राजभवन येथील व्यवस्थेसंदर्भातदेखील सूचना करण्यात आल्या.