गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या नागपूर येथील कृषी महाविद्यालयाचा गतकाळात नावलौकिक होता. देशभरातील सर्वात जुन्या पाच कृषी महाविद्यालयात याचा समावेश असल्याने या महाविद्यालयाकडून विदर्भातील शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. विद्यालयातील तज्ज्ञांनी अधिक उत्पन्न देणारे वाण शोधून शेतीची उत्पादकता वाढविल्यास शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आणण्यात मोठी मदत होऊ शकते. परंतु अर्धा पावसाळा संपला तरी शहराच्या मध्यवर्ती भागातील वनामतीलगतच्या जमिनीची पेरणी करण्याचा विसर महाविद्यालयाला पडला आहे.महाराजबाग येथील कृषी महाविद्यालयालगतच ४४ हेक्टर जमीन आहे. यातील २८ हेक्टर जमीन लागवडीखाली आहे. यातील दोन हेक्टर भागात पीक न घेता बोरू पेरण्यात आला आहे. काही भागात तूर पेरली, पण उगवलीच नाही. उर्वरित २० हेक्टर मात्र अजूनही पडिक आहे. वास्तविक महाविद्यालयाच्या जमिनीत प्रामुख्याने सुधारित बियाणे, अधिक उत्पादन देणारे वाणाचे उत्पादन घेणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना शेतीचे प्रगत शिक्षण मिळावे यासाठी प्रयोग म्हणूनही शेती करणे अपेक्षित आहे. सोबतच त्यांच्याकडून खरीप हंगामात पीक कसे घेतले जाते, याचे प्रात्यक्षिक करून घेतले पाहिजे. मात्र यादृष्टीने प्रयत्न होत नसल्याने कृषी महाविद्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूर शहरात गेल्या महिन्यात ३०० मि.मी. पाऊ स पडला. त्यामुळे पेरणी करता आलेली नाही, असा अफलातून दावा महाविद्यालयाने केला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मात्र अधिक पाऊ स पडल्याची तक्रार नाही.
३०० मि.मी. पावसामुळे पेरणी झाली नाहीनागपूर शहरात गेल्या महिन्यात ३०० मि.मी. पाऊ स पडला होता. महाविद्यालयाची जमीन पानबसनची असल्याने पेरणी करता आलेली नाही. काही भागात एक हजार झाडे लावणार आहे. तर काही भागात तूर पेरली होती.-डॉ. एन. डी. पार्लावार, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय
शेतकरी व विद्यार्थ्यांनी कोणता बोध घ्यावा?जमिनीची मशागत व पेरणी करण्याची जबाबदारी कृषी विद्या विभागाची आहे. जमीन पडिक ठेवणाऱ्यां कृषी विद्या विभागाच्या तज्ज्ञाकडून शेतकरी व विद्यार्थ्यांनी कोणता बोध घ्यावा,असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीची मशागत करण्यासाठी कृषी महाविद्यालयाकडे चार ते पाच ट्रॅक्टर, बैलजोड्या आहेत. शेतीवर काम करण्यासाठी कंत्राटी व कायमस्वरूपी मजूरही आहेत. यावर दर महिन्याला लाखो रुपये खर्च होतात. असे असूनही महाविद्यालयाच्या जमिनीची अद्याप पेरणी झालेली नाही. ही जमीन पडिक राहण्याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बोंडअळीला आळा कसा बसणार?गेल्या हंंगामात बोंडअळीमुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. कृषी महाविद्यालयाने कपाशीचे पीक घेऊ न त्यावर संशोधन अपेक्षित होते. दुर्दैवाने या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नसल्याने बोंडअळीला आळा कसा बसणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नकारात्मक भावना निर्माण होण्याचा धोकाकृषी महाविद्यालय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचाच एक भाग आहे. येथे पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात. यात कृषी वनस्पतिशास्त्र, कृषी अर्थशास्त्र, कृषी कीटकशास्त्र, कृषीशास्त्र, पशुसंवर्धन व दुग्धशाळा, विस्तार शिक्षण, फलोत्पादन, वनस्पती रोग विज्ञान, मृदशास्त्र आणि कृषी. व्यवसाय व्यवस्थापन (कृषी) आदींचा समावेश आहे. सर्व अभ्यासक्रम शेतीशी निगडित आहेत. विद्यालयाचीच जमीन पडिक राहात असेल तर यातून विद्यार्थ्यात नकारात्मक भावना निर्माण होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे.