नागपूर: नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात २ लाख ४५ हजार ८३६ प्रवाशांनी प्रवास केला. त्यात १ लाख २३ हजार २०२ प्रवासी नागपुरात आले तर १ लाख २२ लाख ६३४ प्रवासी नागपुरातून अन्य ठिकाणी गेले. संचालनातून विमानतळाला ९५.२४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
नागपूरविमानतळाचे संचालन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या मिहान इंडिया लिमिटेडतर्फे (एमआयएल) करण्यात येते. वर्षभरात विमानतळावर एकूण २,४५,८३६ प्रवाशांची ये-जा राहिली. एमआयएलला वर्षभरात २४.१७ कोटींचे लँडिंग शुल्क, २४ लाख पार्किंग शुल्क, यूझर विकास फीच्या स्वरूपात ५१.६६ कोटी आणि १९.१७ कोटींचे व्यावसायिक शुल्क प्राप्त झाल्याची माहिती माहितीचा अधिकार कायदा-२००५ अंतर्गत अभय कोलारकर यांना मिळाली.
मिहान इंडिया लिमिटेडने कोलारकर यांना दिलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी एकूण १,१९५ खासगी विमाने आणि हेलिकॉप्टर विमानतळावर उतरले. या माध्यमातून वर्षभरात ९९.४४ लाखांचा महसूल मिळाला. तर सुरक्षेवर ६ कोटी ७ लाख ७० हजार ६२९ रुपयांचा खर्च झाला. वर्षभरात एकूण ९ विमाने आपात्कालीन परिस्थितीत उतरली.
कोलारकर यांना प्राप्त माहितीनुसार डिपार्चर झोनमध्ये पार्किंग व वेटिंग चार्जेस नाहीत. पिकअप क्षेत्रामध्ये आगमन आणि शून्य ते ५ मिनिटे विनामूल्य प्रतीक्षा आणि पिकअप वेळ आहे. शिवाय सर्वसाधारण कार पार्किंगमध्ये विनामूल्य प्रतीक्षा आणि पार्किंगची वेळ नाही. मात्र प्रत्येक झोनमध्ये प्रतीक्षा, पार्किंग वेळ आणि शुल्क लागू आहे. या माध्यमातून एमआयएलला मिळालेल्या महसूलाचे लेखा परीक्षण झालेले नाहीत, असे माहितीच्या अधिकारात म्हटले आहे.