- नरेश डोंगरेनागपूर - उच्चपदस्थ मित्राच्या घरातील चांगल्या स्थितीतील लाखोंचे फर्निचर अगदीच कवडीमोल किंमतीत मिळेल, तुला पाहिजे असेल तर बघ, अशी ऑफर एका पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने सायबर गुन्हेगाराने दिली. त्याचवेळी तो एक चूक करून बसला अन् पोलीस अधिकाऱ्याच्या मित्राच्या ती लक्षात आल्याने सायबर गुन्हेगाराचा डाव फसला.
सायबर गुन्हेगार एवढे निर्ढावले आहे की ते आता थेट पोलीस अधिकाऱ्यांचेच फेक प्रोफाईल बणवून त्या आधारे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना गंडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापुर्वी विद्यमान पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची फेक फेसबूक आयडी तयार करून सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या संपर्कातील व्यक्तींशी संपर्क केला होता. आता नागपुरातून बदलून गेलेल्या आणि सध्या मुंबईत असलेल्या एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे एफबी आयडी तयार केली. त्यावरून पूर्वीचेच फेसबूक फ्रेण्ड असलेल्या एका मित्रासह अनेकांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर त्यांना लुटण्यासाठी जाळे टाकण्याचा प्रयत्न केला. 'सीआरपीएफ मध्ये आपले संतोषकुमार नामक मित्र आहे. त्यांची ट्रान्सफर झाल्यामुळे त्यांच्या घरगुती वापराचे चांगल्या स्थितीतील लाखोंचे फर्निचर विकायचे आहे. किरकोळ किंमत द्यावी लागेल. तुला आवडले तर बघ', अशी ही आफॅर होती. संतोष कुुमार नामक अधिकारी येथे कार्यररत नसल्याचे आणि अशा कोणत्या अधिकाऱ्याची बदली झाली नसल्याचे माहित असल्यामुळे मित्राच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यात दुसऱ्या दिवशी पुन्हा सायबर गुन्हेगाराने त्याला मेसेज करून तुझा मोबाईल नंबर पाठव, असा आग्रह धरला. त्यामुळे मित्राने थेट त्या पोलीस अधिकाऱ्यालाच फोन करून सदर प्रकाराची माहिती दिली. त्याने डोक्यावर हात मारून घेत हा सायबर गुन्हेगारीचा प्रकार असल्याचे सांगून ती फेसबूक आयडी फेक असल्याचे सांगितले.
मराठीमुळे गुन्हेगार गोंधळलाज्या पोलीस अधिकाऱ्याच्या फेसबूकवरून हे मेसेज येत होते, त्यांच्याशी अधून मधून बोलणे सुरू असल्याने मित्राची शंका अधोरेिखत झाली होती. त्यामुळे मित्राने सायबर गुन्हेगाराच्या मेसेजचे उत्तर मराठीत पाठवले. ते समजले नसल्याने सायबर गुन्हेगार जो नुसता इंग्रजीचा वापर करीत होता, त्याने पुन्हा काही नवीन मेसेज इंग्रजीतून पाठविले. मित्राने पुन्हा मराठीत उत्तरे देत, त्याची फिरकी घेतली. त्यामुळे तो गोंधळला अन् त्याने ऑफर सोबतच मेसेजचा भडिमारही थांबविला.