- आशिष रॉय नागपूर : २२ हजार कोटी रुपयांचा टाटा एअरबस प्रकल्प वडोदराला गेल्यानंतर नागपूरकर प्रचंड संतापले आहेत. परंतु केवळ उद्योगच नव्हे तर नागपूर शहराने मागील तीन वर्षात केंद्राच्या दोन महत्त्वाच्या संस्थासुद्धा गमावल्या आहेत, हे विशेष! राष्ट्रीय खनिक आरोग्य संस्थान (एनआयएमएच) ला गुजरातच्या अहमदाबादला हलवण्यात आले. तर केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ (श्रमिक शिक्षा बोर्ड)ला नागपूरवरून दिल्लीत स्थापित करण्यात आले. कुठल्याही पक्षाने या संस्था बाहेर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला नाही.
एनआयएमएचला बंद होण्यापासून वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अंजली साळवे - विटणकर यांनी सांगितले की, जुलै २०१९मध्ये एनआयएमएचला बंद करून ते राष्ट्रीय व्यावसायिक आरोग्य संस्थेत (एनआयओएच) अहमदाबाद येथे विलीन करण्यात आले. त्यावेळी स्थानिक नेत्यांची भेट घेतली. परंतु कुणीही मदत केली नाही. येथे केंद्र सरकारच्या मोठ्या प्रमाणावर खाणी आहेत. त्यामुळे एनआयएमएचला नागपुरातच ठेवायला हवे होते. केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ जेव्हा दिल्लीला शिफ्ट केले जात होते तेव्हाही स्थानिक नेते उदासीन होते.
एनआयपीईआर कुठे आहे?
तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राष्ट्रीय औषधीय शिक्षण व अनुसंधान संस्था (एनआयपीईआर) ची शाखा नागपुरात उघडण्याची घोषणा फेब्रुवारी २०१५मध्ये केली होती. राज्य सरकारने कालडोंगरी येथे ४० एकर जागाही निश्चित केली होती. परंतु सात वर्षे लोटूनही केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या एक्सपेंडिचेर फायनान्स कमिटीने याला हिरवी झेंडी दाखवलेली नाही.
एमआरओ गेला हैदराबादला
फ्रान्सची कंपनी सेफरनने मिहानमध्ये मेंटेनन्स, रिपेअर आणि ओवर हॉल डिपो डेपो (एमआरओ) लावण्याची इच्छा दर्शविली होती. परंतु महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने वेळेत जमीन उपलब्ध करून दिली नाही. या प्रकल्पात १,१८५ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना सेफरनने २०२२मध्ये एमआरओ हैदराबादला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.