आॅनलाईन लोकमतनागपूर : एरवी अभियंता झाल्यानंतर विदेशातील कंपनीत ‘प्लेसमेन्ट’ मिळवून ‘डॉलरपती’ होण्याचे बहुसंख्य विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. ३४ वर्षांपूर्वी त्यांनीदेखील स्वत:ला सिद्ध करण्यासाठी नागपुरातून अमेरिकेत पाऊल ठेवले. मात्र दुसऱ्यांसाठी काम करण्यापेक्षा स्वत: दुसऱ्यांना रोजगार देणारे बनले पाहिजे, हा विचार मनात आला. मागे कुठलेही पाठबळ नसताना झपाटल्यागत काम केले अन् टप्प्याटप्प्याने यशोशिखर चढत गेले. आज त्यांच्याजवळ जगातील सर्व सुखसोई आहेत. कंपनीचा अब्जावधींचा ‘टर्नओव्हर’ आहे. मात्र असे असतानादेखील पाय जमिनीवर ठेवत कार्यरत राहण्यावर त्यांचा भर असून इतकी वर्षे देशाबाहेर राहिल्यानंतरदेखील त्यांनी संस्कृतीशी नाळ कायम ठेवली आहे. नवीन पिढीसाठी आदर्श ठरणाऱ्या या उद्योजकाचे नाव लोकसारंग हरदास असून भल्याभल्यांना अचंबित करणारा त्यांचा प्रवास राहिला आहे.नागपुरातील हडस हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर हरदास यांनी लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमधून रासायनिक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९८३ साली उच्चशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेले असताना एका ‘फार्मा’ कंपनीत नोकरीला सुरुवात केली. परंतु संबंधित रसायन आपणदेखील तयार करू शकतो हा विश्वास त्यांना होता. त्यामुळे त्यांनी एक नवी सुरुवात करण्याचा संकल्प केला आणि जोखीम घेतली. सुदैवाने त्यांना यात यश आले व तेथील वैद्यकीय तज्ज्ञांनीदेखील त्यांना सहकार्य केले. हळूहळू त्यांचे काम वाढत गेले व त्यांनी स्थापन केलेली ‘आॅसम प्रोडक्टर इन्कॉर्पोरेट’ ही कॅलिफोर्नियातील कंपनी ‘डिटर्जन्ट’ उत्पादनांच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी झाली आहे. आजच्या घडीला त्यांची कंपनी अमेरिकेतील ३० हजार ‘रिटेल आऊटलेट्स’शी जुळली असून पाचशेहून अधिक तरुणांना थेट रोजगार मिळाला आहे. आता तर कॅनडासोबत आणखी एका ठिकाणी ते ‘प्लान्ट’ विकत घेणार आहेत.उद्योगात येण्यासाठी भारतीयांनी पुढाकार घ्यावाअमेरिकेत भारतीय समुदाय अल्पसंख्यक असला तरी तो तेथील सर्वाधिक यशस्वी गट ठरला आहे. स्वत:च्या बळावर, मेहनतीतून भारतीय समूहाने हे स्थान मिळविले आहे. स्थानिक राजकारणात रस घेण्यापेक्षा ते नोकरीवर लक्ष केंद्रित करतात. उद्योग स्थापन करायचा म्हणजे विविध गोष्टींना हाताळायचे असते. त्यासाठी भारतीय तयार नसतात. मात्र भारतीयांनी अमेरिकेत मोठे यश संपादित केले आहे. त्यामुळे उद्योगातदेखील त्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे हरदास म्हणाले.‘मिहान’मध्ये गुंतवणूक करणारआपले गृहशहर असलेल्या नागपूरबाबत हरदास यांना विशेष आपुलकी आहे. नागपुरातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी कंपनीत ‘प्लेसमेंट’ दिले आहे. नागपुरातील ‘मिहान’ प्रकल्पातदेखील ते गुंतवणूक करणार आहेत. यासंदर्भात अमेरिकेतील ‘एफडीए’च्या परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतरच पुढील पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.अमेरिकेत स्थापन केले गणेशमंदिरसाधारणत: अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर पुढील पिढ्या भारतीय संस्कृतीपासून तुटत जातात. मात्र हरदास यांनी भारतीय संस्कृतीच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यांनी कंपनीत गणेशमंदिरदेखील उभारले आहे. शिवाय अमेरिकेतील जनतेलादेखील भारतीय संस्कृतीचा परिचय व्हावा, यासाठी ते विविध उपक्रमांचे आयोजन करीत असतात, हे विशेष. त्यांची मुले ध्रुव व इंद्राणी हेदेखील अमेरिकेत वाढूनदेखील भारतीयत्वाशी जुळले आहेत.