नागपूर : दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या नियोजनापासून निकाल लावण्यापर्यंतची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर व अमरावती विभागाला शिक्षण विभागाकडून सातत्याने उपेक्षित ठेवण्यात येत आहे. २०१३ पासून नागपूर बोर्डावर पूर्णकालीन अध्यक्ष व सचिव नसल्यामुळे बोर्डाच्या कामकाजाचा डोलारा प्रभारींवर सुरू आहे. अमरावती बोर्डाचीही अशीच अवस्था आहे. नागपूर बोर्डाचे प्रभारी अध्यक्ष व अमरावती बोर्डाचे सचिव अनिल पारधी निवृत्त झाल्याने या पदांची जबाबदारी पुन्हा प्रभारीवर आली आहे.
सध्या परीक्षेचा काळ आहे, परिस्थिती प्रतिकूल आहे. कोरोनामुळे दहावी बारावीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये शासनाचे निर्णय वेळोवेळी निर्गमित होत आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाच्या बाबतीत मूल्यांकनाचे निकष शासनाने ठरवून दिले आहेत. बारावीच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बोर्डाने परीक्षेचे नियोजन केले होते, पण सद्यपरिस्थिती संभ्रमित करणारी आहे. विद्यार्थी, पालक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ज्यांच्यावर या निकालाची आणि परीक्षा घेण्याची जबाबदारी आहे. या मंडळाच्या विभागीय कार्यालयात मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णकालीन अध्यक्ष व सचिव हे कार्यरत नाहीत. नागपूर बोर्डातून दरवर्षी दहावी अणि बारावीचे किमान ३ लाखांवर विद्यार्थी परीक्षा देतात. असे असतानाही हा सर्व डोलारा प्रभारींच्या भरोशावर चाललेला आहे.
बोरकर यांच्या पदोन्नतीनंतर मंडळ प्रभारींवरच
२०१३ मध्ये चंद्रमणी बोरकर हे नागपूर बोर्डाचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. त्यांची बालभारतीला पदोन्नती झाल्यानंतर संजय गणोरकर यांच्याकडे अध्यक्षाचा प्रभार आला. त्यानंतर, अनिल पारधी, रविकांत देशपांडे हे प्रभारी होते. देशपांडे यांच्या सेवानिवृत्तीनंतर परत अनिल पारधी यांच्याकडे अध्यक्षाचा प्रभार आहे. आता पारधी निवृत्त झाल्यामुळे अध्यक्षाचा प्रभार शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांच्याकडे सोपविण्यात आला. त्याचप्रमाणे, सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार माधुरी सावरकर सांभाळत आहेत. ही पदे पूर्णकालीन नियुक्तीने अद्यापही भरण्यात आलेली नाहीत.
अमरावतीचीही व्यथा सारखीच
अमरावती मंडळात संजय गणोरकर पूर्णकालीन अध्यक्ष होते. त्यानंतर, महेश करजगावकर यांच्याकडे प्रभार आला. त्यांच्यानंतर संजय यादगिरे हेही प्रभारी अध्यक्ष राहिले. सद्या शरद गोसावी हे नियमित अध्यक्ष म्हणून नियुक्त आहेत. त्याचप्रमाणे, सचिव पदावर प्रदीप अभ्यंकर हे नियमित सचिव होते. त्यानंतर, अनिल पारधी हे सचिव पदावर होते आणि आता अमरावती जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी नीलिमा टाके यांच्याकडे प्रभारी म्हणून कार्यभार सोपविण्यात आलेला आहे.
- एखाद्या शाळेत मुख्याध्यापक नसेल, तर शाळेची जी अवस्था होते, तीच अवस्था बोर्डाची झाली आहे. नागपूर व अमरावती विभागीय मंडळ विस्ताराने मोठे आहे. प्रभारी अधिकाऱ्याकडे दोन पदाच्या जबाबदाऱ्या असल्यामुळे ते कार्यक्षमतेने लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे ही महत्त्वाची पदे नियमित रूपाने पूर्णकालीन भरणे गरजेचे आहे.
-योगेश बन, विभाग कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग