लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ईव्हीएमवरील मतमोजणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात येईल. या पाच मतदान केंद्राची निवड एका बॉक्समध्ये चिठ्ठ्या टाकून करण्यात येईल. निवडणूक निर्णय अधिकारी पाच चिठ्ठ्या काढतील. ज्या मतदान केंद्राचे नाव आले, त्याच पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात येईल.
या ईव्हीएममधील मतमोजणीही शेवटीमतमोजणी सुरू असताना कंट्रोल युनिटची बटन दाबूनही निकाल दाखवत नसेल तर अशा मशीन्समधील मतांची मोजणी सर्व मतमोजणी झाल्यानंतर करण्यात येईल. मतदान झाल्यानंतर क्लोजची बटन दाबली नसल्याने ही अडचण निर्माण होऊ शकते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनानुसार क्लोजची बटन दाबून या मशीनमधील मतमोजणी करता येते.
सकाळी ६ वाजता उघडणार स्ट्राँग रुमकळमना येथील स्ट्राँग रुमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच आहे. यामध्ये सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि स्थानिक पोलीस, अशी तीनस्तरीय व्यवस्था आहे. याशिवाय परिसरात दीडशेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ही स्ट्राँग रुम आता गुरुवार २३ मे रोजी सकाळी ६ वाजता राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येईल. यानंतर ईव्हीएम मतमोजनीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तामध्ये पोहोचविण्यात येणार आहे.लोकसभेच्या रामटेक व नागपूर मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी कळमना मार्केट यार्ड परिसरात करण्यात येणार असून, प्रत्यक्ष मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी घेतला.कळमना मार्केट परिसरातील दोन मोठ्या दालनामध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार असून, रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी होणार असून, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.पत्रकारांसाठी माध्यम केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्रांमध्ये संगणक तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतमोजणीची सुरुवात पोस्टल बॅलेट पेपरने होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रांच्या मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक फेरीनिहाय मतमोजणी होणार असून, त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली आहे.यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, जिल्हा पुरवठा अधिकारी लीलाधर वार्डेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी तायडे तसेच विविध विभागांचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अधिकृत पासधारकांनाच प्रवेश, मोबाईल नेण्यास निर्बंधमतमोजणीच्या परिसरालासुद्धा तीनस्तरीय विशेष सुरक्षा राहणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अधिकृत पास असलेल्या व्यक्तींनाच या परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रांमध्ये कुणालाही मोबाईल नेण्यास निर्बंध असल्यामुळे सर्व मतमोजणीसंबंधी अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय पक्षांच्या नियुक्त केलेल्या प्रतिनिधींनी या परिसरात येताना मोबाईल सोबत आणू नये, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.