-योगेश पांडे, नागपूरचक्क गुन्हे शाखेच्या कार्यालयातच ॲप्पल कंपनीच्या बनावट प्रोडक्ट्सची विक्री करताना आरोपी आढळले. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे. एका पोलीस निरीक्षकाच्या समयसूचकतेमुळे उत्तरप्रदेश-दिल्लीच्या या टोळीला जेरबंद करण्यात यश आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जैमुउद्दीन निजामखान सैफी (३५, शहापूर, बुलंदशहा-उत्तरप्रदेश), नईम नूर मोहम्मद खान मलिक (३०, दिल्ली) आणि मोहसीन शौकीन अहमद मलिक (३१,राजीव गांधी नगर, दिल्ली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
मनात संशयाची पाल चुकचुकली
हे आरोपी सोमवारी सायंकाळच्या सुमारास गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या कार्यालयासमोर आरोपी ॲप्पल कंपनीचा आयफोन, वायरलेस चार्जर, वॉच व इअरबड्सची विक्री करत होते. २७ हजारांचे इअरबड्स अडीच हजारांना व ४१ हजारांची ॲप्पल वॉच ते चार हजारांना द्यायला तयार होते. यामुळे पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांना संशय आला.
मुंबईवरून अधिकारी आले आणि बिंग फुटले
त्यांनी ॲप्पलच्या दुप्पल प्रोडक्टविक्रीवर लक्ष ठेवणारी कंपनी ग्रिफीन इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लि.च्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. इतक्या कमी किंमतीत प्रोडक्ट मिळणे शक्यच नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी कंपनीचे प्रतिनिधी यशवंत मोहिते हे मुंबईवरून आले. त्यांनी प्रोडक्ट्स पाहिले असता ते नकली असल्याचे स्पष्ट झाले.
त्यांच्या तक्रारीवरून तीनही आरोपींविरोधात मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे मोमीनपुरा येथील अल कादीर गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते. त्यांच्याकडे ५० लाख रुपये किंमतीच्या बनावट वस्तू आढळल्या.