लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑटोचालक गुंडांमधील वादाचे पर्यवसान एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात झाला. शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास पाचपावलीतील कमाल चौकाजवळ ही थरारक घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.गौरव ऊर्फ पांड्या पिल्लेवान (वय ३०, रा. लष्करीबाग) असे मृताचे नाव आहे. तो गुन्हेगारी वृत्तीचा होता. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सांगतात. आरोपी योगीराज धनविजय (वय ३५), विशाल विश्वकर्मा (वय ३८) आणि गोलू अंकुश मंडाले (वय २१) तसेच त्यांचे साथीदार हे देखील गुन्हेगारी वृत्तीचे असून ते पाचपावलीत ऑटो चालवितात. त्यांच्यात अनेक दिवसांपासून वर्चस्वाचा वाद आहे. त्यातून त्यांच्यात अनेकदा कुरुबुरी होत होत्या. १५ दिवसांपूर्वी पांड्या आणि आरोपींमध्ये असाच वाद झाला. त्यावेळी त्यांनी एकमेकांना धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी रात्री कमाल चौकाजवळच्या शनिचरा मार्केटच्या बाजूला आरोपी उभे होते. तेवढ्यात पांड्या तेथून ऑटो घेऊन जात होता. एकमेकांकडे नजर रोखल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपींनी पांड्यावर हल्ला चढवून त्याला दगडाने ठेचून मारले. अनेकांनी हा प्रकार बघितला मात्र त्यांच्या वादात पडण्याऐवजी अनेक जण पळून गेले. काही वेळेनंतर आरोपींपैकी योगीराज धनविजय स्वत:च पोलिसांकडे गेला आणि त्याने पांड्याचा गेम केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पाचपावली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींची शोधाशोध करून मध्यरात्री पोलिसांनी उपरोक्त तिघांना अटक केली. ऑटोचालक, गुंडगिरी आणि खंडणी वसुली याबाबतीत कमाल चौकात वानखेडेचे नाव चर्चेला आहे. तिकडचे अनेक गुंड सध्या वानखेडेच्या प्रभावात असून, पांड्याचा गेम करणारे आरोपीसुद्धा वानखेडेचे साथीदार असल्याचे सांगितले जाते. मात्र, या गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे की नाही, ते स्पष्ट होऊ शकले नाही. वृत्त लिहिस्तोवर पोलीस त्याची चौकशी करीत होते.