लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराचा एके काळी हिरवळीच्या बाबतीत देशातील टॉप १० शहरात समावेश होता. परंतु मागील काही वर्षात शहरातील परिस्थिती बदलली आहे. राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानात नागपूर २८ व्या क्रमांकावर घसरले आहे. गेल्या काही वर्षात शहरात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे १५०० गुणापैकी फक्त १३० गुण मिळाले आहे.
अभियानात ३९५ शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, ३०४ पंचायत समित्यांनी सहभाग घेतला. ऑक्टोबरमध्ये या अभियानाला सुरुवात झाली. ५ जूनला याचा निकाल जाहीर करण्यात आला. यात ११२७ गुणासह ठाणे पहिल्या क्रमांकावर आहे. नवीन मुंबईला ९७६ तर ग्रेटर मुंबईला ९५० गुण मिळाले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या अभियानाची घोषणा केली होती. पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन मिळावे व उपाययोजना कराव्यात यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. पाणी बचतीसाठी ४००गुण, पृथ्वीसाठी ६००, हवा १००, उर्जा १०० तर संवर्धन यासाठी ३००गुण गृहीत धरण्यात आले होते. वृक्षारोपन, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक, रेन वॉटर हावेंस्टींग या घटकांचाही विचार करण्यात आला. त्यानुसार राज्यातर्फे एकूण गुण घोषित करण्यात आले. वर्गवारीनुसार किती गुण मिळाले. याची माहिती मिळाली नाही. मनपा यात का माघारली अशी विचारणा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असता क्रमांकात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येईल. असे सांगण्यात आले.