पालकमंत्री बावनकुळे यांचा विश्वास : केंद्र व राज्य सरकारची भरघोस मदत नागपूर : राज्य शासनाने पर्यटन विकासाला चालना दिली आहे. याअंतर्गत नागपूर शहराला प्राधान्य दिले जात आहे. केवळ घोषणाच नाही तर निधी सुद्धा उपलब्ध करून दिला जात आहे. राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने नागपूर शहर येत्या चार वर्षात पर्यटन सिटी म्हणून देशातच नव्हे तर जगात ओळख निर्माण करेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे व्यक्त केला. रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी सांगितले की, नागपुरात बुद्धिस्ट सर्किट तयार करून त्याचा विकास केला जात आहे. यात दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि शांतिवन चिचोली हे एकमेकांशी जोडले जातील. यासाठी राज्य शासनाने ७०७ काटीचा प्रस्ताव तयार केला आहे. केंद्र सरकारने सुद्धा स्वदेश दर्शन अंतर्गत याला १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. यासोबतच धापेवाडा-दासा-पाटणसावंगी आणि कोराडी सर्किट सुद्धा तयार केले जात आहे याला सुद्धा केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय कोराडी येथे ‘वॉटर टुरिझम’ तयार केले जात आहे. ६०० एकर परिसरात हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर साकारण्यात येत आहे. १८७ कोटीचा हा प्रकल्प आहे.या प्रकल्पाचे प्रेझेंटेशनही बावनकुळे यंनी यावेळी सादर केले. या प्रकल्पात कोराडी मंदिर परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यात येणार आहे. अत्याधुनिक बस स्टॅण्ड, पर्यटन केंद्र, २५० दुकानांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स, तब्बल १३ एकर परिसरात बगिचा, त्रिकोणी पार्क, भक्त निवास, फेस्टीव्हल ग्राऊंड, चौपटी आदी करण्यात येईल. येथे एक भव्य म्युझियम राहील. त्यात देशाच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविले जाईल. येथील तलावात बोटिंग व साहसी खेळांचा समावेश राहील. तसेच रोप-वे ची व्यवस्था सुद्धा राहील. वॉटर स्पोटर््स राहतील.याप्रसंगी माजी आमदार अॅड. आशिष जयस्वाल आणि दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक पीयूष कुमार उपस्थित होते. (प्रतिनिधी)कोराडी सी-प्लेनने देशाशी जुळणार यासोबतच कोराडी हे सी-प्लेनने देशातील प्रमुख शहराशी जोडण्यात येईल. अंबाझरी, कोराडी आणि खिंडसी हे अंतर्गत सी-प्लेनने जुळणार आहेत. कोराडीत साकारणार ‘शिल्पग्राम’ कोराडी येथे तब्बल १०० एकर परिसरात शिल्पग्राम साकारण्यात येणार आहे. यामध्ये भारताच्या संस्कृतीवर आधारित शिल्प साकारण्यात येतील. हा संपूर्ण प्रस्ताव दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक पीयूष कुमार यांनी तयार केला असून तो केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक जमीन राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे, असेही पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. कालडोंगरी येथे साकारणार फिल्मसिटीयासोबतच नागपुरात फिल्मसिटी तयार होऊ शकते. यासाठी कालडोंगरी येथे ४५० एकर परिसरात फिल्मसिटी तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
चार वर्षात नागपूर होणार ‘टुरिझम सिटी’
By admin | Published: September 09, 2016 3:08 AM