लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉईंट, तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. सोबतच फुटाळा तलाव येथे बुद्धिस्ट थीम पार्क, यशवंत स्टेडियम परिसरात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक नवीन स्टेडियम, वाहनविरहित बिझनेस सेंटर उभारून देश-विदेशातील पर्यटक आणि नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनविण्याचा मानस असल्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.महावितरणच्या ऊर्जा अतिथिगृह येथे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी कोराडी येथे ऊर्जा पार्क प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानुसार, जमीन, पाणी आणि मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध असल्याने नागपूरजवळच्या कोराडी येथे ऊर्जेचे विविध स्रोत आणि त्याचा मानवी जीवनाला होणारा उपयोग लक्षात घेऊन शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यातून हसत-खेळत शिक्षण मिळावे, त्यांना ऊर्जेचे स्रोत प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी हाताळता यावे, सोबतच मनोरंजन व्हावे आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या ऊर्जा पार्क उभारण्यामागचा उद्देश आहे.फुटाळा तलाव येथे जागतिक दर्जाचे बुद्धिस्ट थीम पार्क आणि यशवंत स्टेडियम येथे नवीन स्टेडियम आणि बिझनेस सेंटर उभारण्याचे प्रस्तावित आहे. या सर्व प्रकल्पांचा आराखडा प्राथमिक अवस्थेत असून निधीची तरतूद करून सदर प्रकल्प साकारण्याचा मानस राऊत यांनी व्यक्त केला. सादरीकरणानंतर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राजेंद्र मुळक, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, रामन विज्ञान केंद्राचे संचालक विजय शंकर शर्मा यांची मते जाणून घेण्यात आली.
नागपूरला पर्यटनाचा हब बनविणार : नितीन राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 9:10 PM
देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉईंट, तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे.
ठळक मुद्देऊर्जा शैक्षणिक पार्क कोराडीत साकारणार