योगेश पांडे
नागपूर : ‘डीआरआय’तर्फे विदेशातून भारतात आणलेल्या सोन्याची रेल्वेमार्गाने तस्करी करणाऱ्या देशपातळीवरील मोठ्या रॅकेटचा भंडाफोड झाल्याने तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. मागील काही कालावधीपासून तस्करांसाठी नागपूर हे तस्करीचे एक मोठे केंद्र झाले आहे. विशेषत: हवाईमार्ग व रेल्वेमार्गाने ‘स्मगलिंग’वर भर देण्यात येत असल्याचे चित्र आहे. विदेशातून थेट नागपुरात सोने आणताना ते ‘पेस्ट’च्या स्वरूपात आणले जाते व विविध वस्तूंमध्ये ते बेमालूमपणे मिसळण्यात येते. त्यामुळे अनेकदा तपासयंत्रणांच्या नजरेतून ते सुटते. मात्र तरीदेखील मागील काही महिन्यांत कारवायांमध्ये वाढ झाली आहे.
सोन्यावरील कस्टम ड्यूटी वाचविण्यासाठी विदेशातून लपवून सोने आणले जाते. तसेच त्यानंतर देशाअंतर्गत विमानसेवा व रेल्वेमार्गाद्वारे त्याची तस्करी करण्यात येते. हीच बाब लक्षात ठेवून ‘एअर कस्टम युनिट’तर्फे प्रवाशांच्या सामानावर विशेष लक्ष ठेवण्यात येते. याशिवाय ‘डीआरआय’नेदेखील विमानतळावरील हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच मागील काही महिन्यांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच रेल्वेस्थानकावर कारवायांमध्ये वाढ झाली आहे.
दुबई, शारजामार्गे सोने नागपुरात
विदेशातून दुबई, शारजा, दोहा, सौदी अरेबियामार्गे सोने नागपुरात आणले जाते. बरेचदा तस्कर प्रत्यक्ष सोने न आणता स्थानिक बेरोजगारांना पकडून त्यांना पैशांचे आमिष दाखवत त्यांच्याकडून हे काम करवून घेतात. त्यांना केवळ एक मोबाइल क्रमांक दिला जातो. नागपूर विमानतळावर आल्यावर संबंधित मोबाईलवर फोन करून त्याला विमानतळावरून बाहेर निघाल्यावर सोने देण्यात येते. अगदी ‘डेली वेजेस’ची कामे करणाऱ्यांचादेखील या रॅकेटमध्ये उपयोग करण्यात येतो.
विविध वस्तूंचा दिला जातो ‘शेप’
तस्करांकडून थेट सोन्याच्या बिस्किटांची ‘स्मगलिंग’ न करता त्याची ‘पेस्ट’ तयार करून पाठविण्यात येते. ‘सेमी लिक्विड’ किंवा ‘पेस्ट’च्या स्वरूपात सोने वेगवेगळ्या गोष्टींमध्ये टाकले जाते. एका तस्कराने तर थेट ‘अंडरविअर’मध्ये सोन्याची ‘पेस्ट’ लपवून आणली होती. तर काही महिन्यांअगोदर झालेल्या कारवाईत सोन्याला बेल्टच्या आतील भागात लावण्यात आले होते.
मागील काही महिन्यांतील प्रमुख कारवाया
९ मे : एनसीबीच्या मुंबई कार्यालयाकडून नागपूर विमानतळावर सौदी अरेबियातून आलेले साडेतीन किलो सोने जप्त.
११ ऑगस्ट : एअर कस्टम युनिटकडून शारजाहून नागपुरात हवाईमार्गे आणलेले २९ तोळे सोने जप्त.
१८ ऑगस्ट : डीआरआयकडून दुबईतून हवाईमार्गे आलेले ७४ तोळे पेस्ट स्वरूपातील सोने जप्त.
१८ सप्टेंबर : एअर इंटेलिजन्स युनिटकडून विमानतळावर १६९ तोळे सोने जप्त.
१९ सप्टेंबर : कस्टम विभागाकडून विमानतळावर पावणेदोन किलो सोने जप्त.
२९ सप्टेंबर : कस्टम विभागाकडून शारजातून आलेल्या प्रवाशाकडून कॉफी मेकरमध्ये आणलेले साडेतीन किलो सोने जप्त.
६ ऑक्टोबर : शारजाहून आलेल्या महिलेकडून कस्टम विभागाकडून दीड किलो सोने जप्त.