आनंद शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानी टायगर कॅपिटलनंतर आता कॅन्सर कॅपिटल बनण्याकडे अगे्रसर आहे. नागपुरात मोठ्या प्रमाणात सुपारी आणि प्रतिबंधित तंबाखूयुक्त खर्रा विकल्या जातो, हे याचे मुख्य कारण आहे. यातच सुपारीची गोष्ट केल्यास नागपुरात भेसळयुक्त सुपारीचा गोरखधंदा वेगाने फोफावत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईनंतरही या व्यवसायाचे धागेदोरे दूरवर पसरत आहेत. भेसळयुक्त सुपारीने कॅन्सर होत असल्याचे सिद्ध झाल्याने, या सुपारीच्या विक्रीवर प्रतिबंध लावण्याची मागणी आता सर्व स्तरातून होऊ लागली आहे.व्यावसायिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिकनी (भरडा वा लाल) आणि पांढरी अशी दोन प्रकारची सुपारी असते. भेसळ केलेली लाल वा चिकनी सुपारी आसाम येथून नागपुरात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणण्यात येते. ही सुपारी टाकाऊ असते. यामध्ये ‘नॉन परमिटेड कलर’ असल्यामुळे खाण्यायोग्य नसते. ही सुपारी नियमितरीत्या खाण्याने गळा, फुफ्फुस आणि आतड्याचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. या सुपारीचे सेवन महिला करतात. त्यामुळे नपुंसक होण्याची शंका वाढते. चिकनी वा लाल सुपारीचा उपयोग पॅकेटबंद गुटखा तयार करण्यासाठी होतो.नागपुरात या सुपारीचे चार व्यापारी आहेत. लाल वा चिकनी आणि पांढरी सुपारी ही सुपारीच असल्याचे सांगून ट्रान्सपोर्टद्वारे आणण्यात येते. ही सुपारी कोणत्या दर्जाची आहे, हे कुणीही पाहत नाही. रंग दिलेली लाल सुपारीची विक्री करता येत नाही. व्यावसायिकांना अखाद्यान्न वस्तूंच्या विक्रीसाठी नव्हे तर केवळ खाद्यान्न वस्तूंच्या विक्रीसाठी परवाना देण्यात येतो. त्यानंतरही नागपुरात भेसळयुक्त आणि आरोग्यासाठी हानीकारक सुपारीचा धडाक्यात व्यवसाय सुरू आहे. यात अन्न व औषध प्रशासन विभागाची भूमिका संशयाच्या घेऱ्यात आहे.
पांढऱ्या सुपारीत सल्फरडाय ऑक्साईडपांढरी सुपारी केरळसह इंडोनेशियातून नागपुरात येते. दक्षिण भारतातील पांढरी सुपारी नैसर्गिक असते. तर विदेशातील सुपारीला सल्फरडाय ऑक्साईडने प्रक्रिया करून पांढरी केली जाते. ही सुपारी आरोग्यासाठी हानीकारक आहे.ती इंडोनेशियातून श्रीलंका मार्गाने भारतात आणली जाते.
कशी तयार होते ‘लाल’ सुपारीआसाम राज्यात भेसळखोरांकडून एका मोठ्या टॅन्कमध्ये ‘नॉन परमिटेड कलर’ टाकला जातो. यामध्ये चिकनी (भरडा) सुपारी टाकण्यात येते. या रंगात सुपारी भिजवून ठेवली जाते. काही वेळेनंतर सुपारीला गोंदाच्या पाण्यात टाकण्यात येते. यामुळे रंग सुपारीला येतो. त्यानंतर निश्चित तापमानावर सुपारीला तापविण्यात येते. अशाप्रकारे भेसळयुक्त लाल सुपारी तयार करण्यात येते.
माल डायव्हर्ट, कारवाईवर प्रश्नचिन्हगेल्या काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) नागपुरातील चार मोठ्या सुपारी व्यापाऱ्यांच्या दुकान आणि गोदामांवर छापे टाकून ८ कोटी ५० लाख रुपयांची चिकनी (लाल) सुपारी जप्त केली होती. या कारवाईत एफडीएच्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची महत्त्वाची भूमिका होती. या कारवाईनंतर आसाम येथून नागपुरात येणारी लाल सुपारी उत्तर प्रदेश, राजस्थान आणि आंध्र प्रदेशात डायव्हर्ट करण्यात आली. यादरम्यान या कारवाईवर पांघरूण घालण्यासाठी एफडीएच्या अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय दबाव टाकण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाई करण्यापूर्वी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी बाजारातून या सुपारीचे नमुने घेतले होते. प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर ही सुपारी भेसळयुक्त असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. या अहवालाच्या आधारे अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती.