वाडी (नागपूर) : शहरापासून अगदी ५०० मीटर अंतरावर असलेल्या आणि नवीन नागपूर म्हणून झपाट्याने उदयास येत असलेल्या बेसा-बेलतरोडी व पिपळा-घोगली या ग्रामपंचायतीला नगरविकास विभागाने नगरपंचायतीचा दर्जा बहाल केला आहे. या भागात रिअल इस्टेटच्या व्यवसायासाठी प्रचंड पोटॅनिशअल असल्याने या व्यवसायाला नगरपंचायत झाल्याने मोठा बूस्ट मिळणार आहे.
‘बेसा-पिपळा’ ही जिल्ह्यातील आठवी नगरपंचायत आहे. डिसेंबरमध्ये नगरविकास विभागाने पारशिवनी तालुक्यातील कांद्री ग्रा. पं.ला नगरपंचायतीचा दर्जा दिला होता. बेसा-बेलतरोडी, पिपळा-घोगली ग्रा. पं. क्षेत्राचे गेल्या दहा वर्षांत झालेले नागरीकरण विचारात घेता या दोन्ही ग्रा. पं.ला नगरपंचायतीचा दर्जा देण्याची मागणी होती. या दोन्ही ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकसंख्या लाखाच्या जवळपास असल्याने ग्रामपंचायत स्तरावर मिळणाऱ्या निधीतून गावाचा विकास करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला अनेक अडचणी येत होत्या. २६ जानेवारी २०१९ ला शासनाकडे
संबंधित ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या नगरपंचायतीची रीतसर रचना होईपर्यंत उक्त नगरपंचायतीचे अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी वानाडोंगरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने पाठ पुरावा करण्यात आला. या परिसराला आता विकासाच्या वाटेवर नवीन भरारी मिळेल. पिपळा ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी योग्य निर्णय घेत मान्यता दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो.
- नरेश भोयर, सरपंच, पिपळा-घोगली, ग्रामपंचायत
जिल्ह्यात ८ नगरपंचायती व १४ नगरपरिषदा
नागपूर जिल्हा १३ तालुक्यांत विस्तारला आहे. यात नव्याने झालेल्या बेसा-पिपळा नगरपंचायतमुळे जिल्ह्यात ८ नगरपंचायती होतील. तर १४ नगर परिषदेचाही जिल्ह्यात समावेश आहे. शहरालगत कामठी, वाडी व वानाडोंगरी नगर परिषद आहे. तर महादुला ही नगरपंचायत आहे.