लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चांगल्या-वाईटाची समज नसलेल्या अल्पवयीन मुलींना विविध प्रलोभने दाखवून वासनेची शिकार बनवणाऱ्या नराधमांना कठोर धडा शिकवणारा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला. अल्पवयीन मुलीसोबत तिच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवणे हाही बलात्कारच होतो, असे कोर्टाने स्पष्ट करून संबंधित आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निकाल दिला.
आरोपीने बचाव करण्यासाठी पीडित मुलीच्या सहमतीचा मुद्दा मांडला होता. त्यामुळे बलात्काराचा गुन्हा सिद्ध होत नाही, असा दावा आरोपीने केला. कोर्टाने हा मुद्दा फेटाळून लावला. अल्पवयीन मुलीने शरीरसंबंधास दिलेल्या सहमतीला कायद्याच्या दृष्टिकोनातून काहीच महत्त्व नाही, असे निकालात नमूद केले. गजानन देवराव राठोड असे आरोपीचे नाव आहे. तो यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील रहिवासी आहे. २०१८ मध्ये विशेष सत्र न्यायालयाने त्याला मुलीवर बलात्कार करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवून कमाल १० वर्षे सश्रम कारावास व ११ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती.
प्रेमाच्या जाळ्यात ओढले
- घटनेवेळी पीडित मुलगी केवळ १४ वर्षांची होती. आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले होते. आरोपीने २७ जून २०१६ रोजी तिला पळवून आत्याच्या घरी नेले. मुलीशी लग्न केल्याचे सांगितले.
- आत्याने त्यांना राहण्यासाठी खोली दिली. त्यामुळे आरोपीने दोन दिवस मुलीसोबत शरीरसंबंध ठेवले. तिसऱ्या दिवशी नातेवाईकांनी दोघांनाही नेरमध्ये परत आणले. दरम्यान मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.