नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह मध्यभारतातील सडक्या सुपारीचे नेटवर्क तोडण्यासाठी वरिष्ठ पातळीवर मंथन सुरू असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या समाजकंटकांकडून महिन्याला लाखोंची ‘सुपारी’ घेणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सडक्या सुपारीच्या नेटवर्कचा भाग बनलेल्यांवर धक्कादायक कारवाई होण्याचे संकेत संबंधित सूत्रांकडून मिळाले आहेत.जगात सर्वाधिक सुपारीचे उत्पादन घेणाऱ्या देशांमध्ये इंडोनेशियाचे नाव आहे. प्रचंड उत्पादन असल्याने तेथे सुपारीचा दर्जा अत्यंत चांगला आणि किंमत कमी आहे. निकृष्ट दर्जाची सुपारी तेथे चक्क डम्पिंग यार्डमध्ये फेकली जाते. घाणीत फेकलेली आणि आरोग्यास घातक असलेली ही सुपारी मॅनमार्ग (बर्मा) मधून रंगून पोर्टमार्फत बाहेर काढली जाते. भारतात ही सुपारी इम्फाल मार्गे आणली जाते. मिझोरममध्ये हेलाकांडी, सिंलचर, करिमगंज, लालबाजारात एका पोत्याचे दोन पोते करून ही सुपारी मध्यभारतात आणली जाते. अत्यंत निकृष्ट (सडलेली) आणि आरोग्यास घातल असलेली ही सुपारी गंधकाच्या भट्टीत टाकून टणक आणि पांढरी केली जाते. नागपूर-मध्यभारतात खर्रा-गुटखा खाणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे. तंबाखू आणि चुन्याच्या मिश्रणात ही सडलेली सुपारी बारीक करून ती ग्राहकांना खºर्याच्या रूपात दिली जाते. सुगंधित सुपारी आणि मिठी सुपारी म्हणूनही ती विकली जाते. लहान मुलांपासून तो वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील सुपारी शौकिनांच्या घशात ही सडलेली सुपारी वेगवेगळ्या रूपात जाते. त्यामुळे मुखरोग आणि कर्करोगासारखे भयावह रोग ही सुपारी खाल्ल्यामुळे होतात. ही सुपारी नियमित खात असल्याने ‘लॉकजा’ सारखा रोगही होतो. त्यामुळे खर्रा खाणाऱ्यांचे तोंड पूर्णपणे उघडले जात नाही. परिणामी त्याला खाणे-पिणे (रोजचे जेवण) करण्यात आणि बोलण्यातही अडचण होते. एवढे गंभीर परिणाम या सडक्या सुपारीच्या सेवनाने होत असले तरी समाजकंटकांचा हा गोरखधंदा उपराजधानीत गेल्या दहा वर्षांपासून बिनबोभाट सुरू आहे. नागपूर हे या गोरखधंद्याचे डेस्टिनेशन बनले आहे. सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून नागपुरातून रोज २०० ते ५०० पोती घातक सुपारी बाहेर पाठविली जाते. हीच सुपारी नागपुरातील शेकडो पानटपरींवरही पोहोचते. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते. हा गोरखधंदा करणाऱ्या समाजकंटकांनी कारवाईचे अधिकार असलेल्या यंत्रणांमधील बहुतांश अधिकारी, कर्मचारी यांना आपल्या पापात सहभागी करून घेतले आहे. त्यांच्याकडे महिन्याला मोठी सुपारी (रोख रक्कम) पोहोचत असल्याने फूड, महसूल आणि पोलीस यंत्रणेतील मंडळींनी या गोरखधंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष चालविल्याचा आरोप होतो. या गोरखधंद्यात नवीन आलेल्या सुपारीबाजावर छापा मारून, १०० ते २०० पोती पकडल्याचा बोभाटा करून कारवाईचा बनाव केला जातो. गेल्या चार-पाच वर्षांत अनेक सुपारीवाल्यांवर कारवाई झाली, मात्र नंतर त्याचे काय झाले, हे उघड झालेले नाही.
ठिकठिकाणचे गोदाम भरलेलेतेलंगणात कोट्यवधींची रक्कम पकडली गेल्याने नागपुरातील मिरची-मसाला निर्यातदार प्रकाश वाधवानी यांचे निवास आणि प्रतिष्ठानांवर आयकर विभागाने कारवाई केली. या कारवाईने संबंधित वर्तुळात खळबळ उडाली असली तरी फूड, महसूल आणि पोलीस यंत्रणेपैकी कुणी सुपारीच्या गोदामांवर धाडसी कारवाईची हिंमत दाखविलेली नाही. वाधवानी-छाबरानीच्या व्यावसायिक स्पर्धेतून पुढची कारवाई होऊ नये म्हणून ‘मनीष‘सह आणखी काही जण सरसावले आहेत. त्यांनी सुपारीवाल्यांमध्ये आपसी समेट घडवून आणण्याचे प्रयत्न चालविले आहे. अनेकांना आश्वस्त करण्यात आल्याने चिरागसह अनेक ठिकाणी कोट्यवधींची सडकी सुपारी अद्यापही पडून आहे. नागपूर शहराबाहेर (आॅक्ट्राय फ्री झोनमध्ये) अल्ताफची भोपाली अद्यापही सुरूच आहे. या संपूर्ण गैरप्रकारात चटवालचीही भूमिका महत्त्वाची आहे. गोरखधंद्यात गुंतलेल्या समाजकंटकांना विविध विभागातील काही अधिकारी-कर्मचारी साथ देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे नेटवर्क भक्कम आणि गुंतागुंतीचे असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या वरिष्ठ पातळीवर तक्रारी झाल्या आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत धक्कादायक कारवाई होण्याचे संकेत संबंधित सूत्रांकडून मिळाले आहे.