नागपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के .चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष येत्या काळात महाराष्ट्रातही लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदेसह सर्व निवडणुका लढविणार आहे, अशी घोषणा भारत राष्ट्र समितीचे पूर्व विदर्भ समन्वयक ज्ञानेश वाकुडकर यांनी केली.
भारत राष्ट्र समितीची विभागीय नियोजन बैठक रविभवन येथे रविवारी पार पडली. अध्यक्षस्थानी ज्ञानेश वाकुडकर होते. प्रमुख वक्ते म्हणून माजी आमदार दीपक आत्राम, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वसंत बोंडे, दगडू पडिले, नागपूर जिल्हा समन्वयक रविकांत खोब्रागडे, मनिष नांदे (वर्धा), अजय खानोलकर (गोंदिया), मुरलीधर भर्रे (भंडारा), वमशिकृष्ण अरकिल्ला (चंद्रपूर) आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना वाकुडकर म्हणाले, शेतकऱ्याला कुठलीही जात, पंथ,धर्म, भाषा नसते. आमचा पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जाईल. शेतकऱ्यांचे कल्याण हाच आमचा मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बीआरएसने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला समर्थन दिले आहे. बहुतांश विदर्भवाद्यांनी या पक्षाला समर्तन दिले असल्याचा दावाही वाकुडकर यांनी केला. संचालन डॉ. नीलेश वानखेडे यांनी केले. पक्षाच्या बैठकीला बाबाराव मस्के, सागर बत्तुलवार, नाना चव्हाण, ॲड. संतोष कुळमेथे, नीलकंठ काचेवार, किशोर उपासे, दयाराम सहारे, प्रशांत तागडे, बबनराव धुर्वे, नरेश पवनी, आकाशपुरी मुल्तानी, सतीश मडावी, अतुल कांबळे, ब्रजभूषण बैस, प्रशांत ढोले, अजय दारल, राहुल मुन, चेतन काकडे, आकाश सुखदेवे, नंदू मून, अनिलकुमार नागबौद्ध, गुणवंत सोमकुंवर, नीलेश लोखंडे, पंकज भालेराव, सूरज चिकटे, प्रा. रमेश पिसे आदी उपस्थित होते.
तेलंगणात शेतकरी आत्महत्या नाहीततेलंगणा हे नवे राज्य अस्तित्वात आले असले तरी तेथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीत. तेथील राव सरकारने शेतकरी कल्याणाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत, असे रविकांत खोब्रागडे यांनी सांगितले. माजी आमदार वसंत बोंडे यांनी तेलंगणाची प्रगती पाहून आपण भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश घेतल्याचे सांगितले.