कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनाने अन्य राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर पायबंद घातला आहे. मात्र, याउलट नागपूरला छत्तीसगडच्या भिलाई आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. भिलाई स्टील प्लांट येथून रोज एक टँकर लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याचे अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी स्पष्ट केले आहे.कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, ऐंशी टक्के उत्पादन रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठादारांना दिले आहेत. ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुरवठ्याचा रोजचा अहवाल अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांना सोपविला जात आहे. मात्र, याचदरम्यान राज्य सरकारने अन्य राज्यांकडे पाठविण्यात येणारे ऑक्सिजन रोखून धरले आहे. याच्या अगदी उलट जिल्ह्यातील मोठ्या ऑक्सिजन उत्पादकांपैकी एक असलेल्या बुटीबोरी येथील ऑईनॉक्स एअर प्रॉडक्टसह अन्य कंपन्यांना भिलाई स्टील प्लांट आणि इंदूर येथील संयंत्रातून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. बुटीबोरी येथीलच आदित्य ऑक्सिजनलासुद्धा लिक्विड ऑक्सिजनसाठी इंदूरकडे बघावे लागत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यातच अन्य सहा उत्पाकांपैकी दोन युनिट्स बंद आहेत. प्रशासनाकडून हे युनिट्स पुन्हा सुरू करण्यास प्रारंभ झाला आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. जवळपास रोज सात हजार सिलिंडरची मागणी केली जात आहे. मेयो-मेडिकल आणि काही खासगी रुग्णालयांचे स्वत:चे लिक्विड ऑक्सिजन प्लांट आहेत. परंतु, लिक्विड ऑक्सिजन टँकची उणीव निर्माण झाली आहे. एकट्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात रोज ८०० रिफिलची गरज पडत आहे. येत्या काही दिवसात ऑक्सिजनचा पुरवठा वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. बल्लारपूर इंडस्ट्रीजसह अनेक उद्योगांकडून रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.भिलाईच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा: जिल्ह्यातील संयंत्रांना ऑक्सिजनचा पुरवठा अबाधित करण्यासाठी भिलाईच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. भिलाई प्रशासन सहकार्य करण्यास तयार असल्याचे अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी सांगितले. तेथून रोज टँकरद्वारे ऑक्सिजनची गरज भागवली जात आहे. जिल्ह्यातील बंद पडलेल्या युनिट्सला सुरू करण्यास पुढाकार घेण्यासोबतच महावितरणशी चर्चा करून वीज दरांबाबतच्या अडचणी सोडविण्यात येत असल्याचे फडके म्हणाले.