- मोरेश्वर मानापुरेनागपूर - महामेट्रोतर्फे बांधकाम करण्यात येणाऱ्या मानस चौक ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सपर्यंतच्या भुयारी (अंडरपास) मार्गाचे भूमिपूजन झिरो माईल स्टेशनवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी गडकरी यांनी २०० कोटींच्या विकास कामांची घोषणा केली. त्यात महामेट्रो ५ विकास कामे करणार आहे.
झिरो माईल ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या मार्गाचे ‘स्व. दत्ताजी डिडोळकर मार्ग’ असे नामकरण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. मानस चौक ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हा भुयारी मार्ग पूर्व, मध्य आणि दक्षिण नागपूरला पश्चिम नागपूरशी जोडण्याचे काम करणार आहे. ८० कोटी रुपयांच्या या मार्गाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. आजवर अनेक रस्ते, उड्डाणपूल आणि टनेल्स बांधले, पण केवळ हा मार्ग आणि भुयारी मार्गाला दत्ताजींचे नाव देऊ शकलो, ही माझ्यासाठी आनंदाची बाब असल्याचे गडकरी म्हणाले. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने २०२२-२०२३ या वर्षात एकूण २५ आरओबी आणि आरयूबी बांधकामांना मान्यता दिली आहे.
प्रास्ताविक जयंत पाठक यांनी तर मनीष सोनी यांनी आभार मानले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. कार्यक्रमाला आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. प्रवीण दटके, आ. पंकज भोयर, आ. डॉ. रामदास आंबटकर, माजी खा. अजय संचेती, अरुण लखानी, माजी आ. प्रा. अनिल सोले, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनपा आयुक्त अभिजित चौधरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.