नागपूर-
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fhadnavis) यांच्यावर आज पुन्हा एकदा हल्लाबोल केला. समीर वानखे़डे, मुन्ना यादव, हैदर आझम आणि बनावट नोटा प्रकरणावरुन नवाब मलिक यांनी फडणवीसांवर खळबळजनक आरोप केले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणात बनावट नोटांचा खेळ सुरु असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला. यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण आल्याचे दिसून येत आहे. मलिक यांनी ज्या मुन्ना यादव यांचा उल्लेख केला त्यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे.
"नवाब मलिक यांच्यासारखे माझे कुठल्याही अंडरवर्ल्ड किंवा दहशतवाद्यांशी संबंध नाहीत", असे म्हणत भाजप नेते मुन्ना यादव यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे. आज सकाळी नवाब मलिक यांनी मुन्ना यादव यांचं नाव घेत एका गुंडाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंडळाचा अध्यक्ष केल्याचा आरोप केला होता. मुन्ना यादव हे कुख्यात गुंड असून त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे आहेत असा दावाही मलिक यांनी केला. मात्र, मुन्ना यादव यांनी मालिकांचे सर्व आरोप फेटाळत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी मलिक यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत. म्हणून ते माझ्या माध्यमातून फडणवीसांना टार्गेट करत आहेत. माझ्या विरोधात असलेल्या राजकीय गुन्ह्यांना नवाब मलिक गुन्हेगारी जगताशी जोडून मला गुंड म्हणत आहेत, असे मत व्यक्त केले.
मलिकांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे ही मुन्ना यादव यांनी जाहीर केले आहे. "नवाब मलिक यांची औकात १ रुपयाची आहे. म्हणूनच त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा देखील एक रुपयाचाच ठोकणार. त्यांनाही माझं आवाहन आहे की माझी चौकशी करावी. माझ्यावरील आरोप जर सिद्ध झाले तर राजकारणातून सन्यास घेईन. पण मी कोर्टात जाणार आणि तिथं नवाब मलिकांवरील आरोप सिद्ध करणार", असं मुन्ना यादव यांनी म्हटलं आहे.
ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव हे सुरुवातीला स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर या विधानसभा मतदार संघातील चुनाभट्टी परिसरातून नगरसेवक होते. यादव हे नागपुरात देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक आणि उजवा हात म्हणून ओळखले जातात. मुन्ना यादवच्या समर्थनास आणि नवाब मलिकांच्या विरोधात आज नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले. तर नवाब मलिक यांचा पुतळा जाळून कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केलाय. या घटनेनंन्तर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तणावाची स्थितीत निर्माण झाली आहे.