लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१४ च्या निवडणुकांप्रमाणे शहरातील सहाही जागा जिंकण्याच्या विश्वासाने उतरलेल्या सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भाजपच्या दोन जागा हातून गेल्या. मजबूत संघटन असल्याचा दावा करणाऱ्या भाजपला सहा महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले मतदानही वाचवता आले नाही. गडकरी यांना ज्या विधानसभा मतदार संघात बढत मिळाली होती, ती मते सुद्धा भाजपला कायम राखता आली नाही. पक्षाला काही महिन्यातच १ लाख ४३ हजार ९४९ मतांचे नुकसान सहन करावे लागले.यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चरणात नागपूर लोकसभा मतदार संघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार झाले. पक्षाचे नेते व उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल ६ लाख ६० हजार २२१ मते घेत विजय प्राप्त केला. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना ४ लाख ४४ हजार २१२ मते मिळाली. भाजप केवळ उत्तर नागपुरात माघारला. ते सुद्धा केवळ ८,९१० मतांनी. उर्वरित पाचही विधानसभा मतदार संघात गडकरी यांना प्रचंड लीड होती. सध्या २१ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदार क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शहरातील सहाही विधानसभा मिळून भाजपला केवळ ५ लाख १६ हजार २७२ मते मिळाली. त्यामुळे सरळसरळ सहा महिन्यातच पक्षाचे १ लाख ४३ हजार ९४९ मते कमी झाली. भाजपला उत्तर नागपूरसह पश्चिम नागपुरातही पराभव पत्करावा लागला.दुसरीकडे विधानसभेत शहरातील सर्व जागा गमावलेल्या काँग्रेसला उत्तर नागपुरात आघाडी मिळाली होती. यात आणखी सुधारणा करीत विधानसभेत उतरलेल्या काँग्रेसने उत्तरसह पश्चिम नागपुरातही विजय खेचून आणला. दक्षिण आणि मध्य नागपुरातही काँग्रेसने कडवी झुंज दिली. या दोन जागा जिंकण्यासाठी भाजपला घाम गाळावा लागला. फार थोड्या मतांच्या फरकाने या दोन जागा भाजपने जिंकल्या. इतकी चांगली कामगिरी केल्यानंतरही काँग्रेसच्या मतांमध्ये मात्र केवळ १७७३८ मतांचीच भर पडली.भाजपच्या निराशाजनक कामगिरीमागे स्थानिक नेत्यांचा अतिआत्मविश्वास हे सुद्धा एक कारण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरच बहुतांश कार्यकर्ते अवलंबून राहिल्याचेही कारण सांगितले जाते. दक्षिण नागपूरमध्ये पक्षाला माजी उपमहापौर सतीश होले आणि किशोर कुमेरिया यांची बंडखोरी रोखता आली नाही. त्याचप्रकारे तिकीट नाकारण्यात आलेल्या एका पदाधिकाऱ्यांची पत्नी काँग्रेस उमेदवाराच्या पत्नीबरोबर प्रचारात फिरत होती.त्यामुळे भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्या पत्नी सविता यांनाही सक्रिय व्हावे लागले. या सर्व गोष्टी अगोदरच नियंत्रित करता आल्या असत्या तर निवडणुकीत कडवा संघर्ष करावा लागला नसता. उत्तर नागपुरात अनेक बौद्धबहुल भागात मतदानाच्या दिवशी बुथ सुद्धा लावण्यात आले नाही. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते दुखावले गेले. पक्षाचे उमेदवार डॉ. मिलिंद माने यांना मागील पाच वर्षात स्वत:च्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करता आली नाही. मतदार संघ बांधता आला नाही. पक्षाने सुद्धा त्यांना तसे करू दिले नाही. त्यांच्या प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमेचा उपयोग पक्षालाही करून घेता आला नाही. काही पदाधिकाऱ्यांचा दावा आहे की, डॉ. माने यांना सुद्धा परिस्थितीचे आकलन झाले होते. त्यामुळेच त्यांनी कदाचित आपल्या रुग्णालयाकडे अधिक लक्ष देणे सुरु केले होते. पश्चिममध्ये सुद्धा माजी आमदार सुधाकर देशमुख यांना त्यांच्या विरोधातील लाट दिसून आली नाही. पूर्व नागपूरला आपला गड बनवलेल्या भाजपला स्मार्ट सिटी व पारडी उड्डाण पूल सारखे मुद्दे व्यवस्थित हाताळता आले नाही. परिणामी काँग्रेसचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांनी ७९,९७५ मते घेऊन भाजपचे विजयी उमेदवार कृष्णा खोपडे यांना केवळ २४ हजाराच्या लीडवर रोखून धरले. लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी पूर्व नागपुरातून ७५,३८० मतांची आघाडी घेतली होती. त्याचप्रकारे मध्य नागपूरमध्ये सुद्धा भाजपचे उमेदवार विकास कुंभरे यांना संघर्ष करावा लागला. एमआयएमचा उमेदवार नसता तर ही जगाही भाजपच्या हातून गेली असती.
नागपुरात सहा महिन्यातच भाजपची १,४३,९४९ मते घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 12:26 AM
नितीन गडकरी यांना ज्या विधानसभा मतदार संघात बढत मिळाली होती, ती मते सुद्धा भाजपला कायम राखता आली नाही. पक्षाला काही महिन्यातच १ लाख ४३ हजार ९४९ मतांचे नुकसान सहन करावे लागले.
ठळक मुद्देकाँग्रेस दोन जागांवर विजयी, परंतु मतांमध्ये केवळ १७,७३८ ने वाढ