लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निराधार अवस्थेत जगणाऱ्या वृद्ध बहीण-भावाचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर सुरेंद्रनगर-तात्याटोपे नगरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. उपासमारीमुळे या दोघांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.मोहनलाल रंझूमल मोटवानी (वय अंदाजे ७५ वर्षे) आणि शांताकौर मोटवानी (वय अंदाजे ७० वर्षे) अशी मृताची नावे आहेत. ते दोघे बहीण भाऊ असल्याचे शेजारची मंडळी सांगतात. मात्र, त्याबाबत रात्रीपर्यंत बजाजनगर पोलिसांकडे निश्चित माहिती नव्हती. हायकोर्ट मार्गावरील सुरेंद्रनगरातील प्लॉट नंबर १४ मध्ये एका जुनाट घरात ते राहत होते. मोहनलाल मोटवानी रेल्वेतून निवृत्त झाले होेते. त्यांना मुल-बाळ नव्हते. शांताकौर यांचेही तसेच होते. हे दोघेच तेथे राहायचे. ते फारसे कुण्या नातेवाईकांकडे जात नव्हते किंवा नातेवाईकही त्यांच्याकडे येत नव्हते. फारच आवश्यक असले तरच ते घराबाहेर पडायचे अन्यथा त्यांचे दार आतून बंदच राहायचे. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास त्यांच्या घरातून तीव्र दुर्गंध येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी बजाजनगर पोलिसांना कळविले. त्यामुळे तेथे पोहचलेल्या पोलिसांनी दारावर थाप मारून बराच वेळ वाट बघितली. आतून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर पोलीस दार तोडून आत गेले. तेथे शांताकौर आणि मोहनलाल यांचे मृतदेह पडून दिसले. मृतदेहाची अवस्था बघता त्यांचा चार ते पाच दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला. घरातील अवस्था मन विषण्ण करणारी होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू वृद्धापकाळातील असहायता आणि उपासमारीमुळे झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला. दोघांचेही मृतदेह रुग्णालयात रवाना करून पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या सिंधी बांधवांकडे चौकशी केली. मात्र, रात्री ८ वाजेपर्यंत त्यांचे कोणतेही नातेवाईक पोलिसांकडे पोहचले नव्हते.पाळीव कुत्राही मेलामोटवानी यांना मुलबाळ नव्हते मात्र त्यांना कुत्र्यांचा लळा होता. त्यांच्याकडे आधी पाच सहा तर आता एक पाळीव कुत्रा होता. बाजूच्या खोलीत कुत्राही मृतावस्थेत आढळला. बजाजनगर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
नागपुरात एकाकी वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:39 PM
निराधार अवस्थेत जगणाऱ्या वृद्ध बहीण-भावाचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर सुरेंद्रनगर-तात्याटोपे नगरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. उपासमारीमुळे या दोघांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
ठळक मुद्देउपासमारीमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज : सुरेंद्रनगरातील घटना