लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपेक्षेप्रमाणेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या २४ पैकी ५ उमेदवारांनी अखेरच्या दिवशी माघार घेतल्याने, ९ फेब्रुवारीला केवळ औपचारिकता पार पाडली जाईल.गेले वर्षभर कामापेक्षा निवडणूक न घेण्यामुळेच नाट्य परिषदेची चर्चा जास्त रंगली होती. अखेर निवडणूक लागली, उमेदवारांनी अर्जही भरले आणि तारखेआधीच निर्णयही लागल्याने, नसते खटाटोप कशासाठी असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे. नागपूर शाखेच्या १९ पदासाठी होणाऱ्या या निवडणुकीत एकूण २४ इच्छुकांनी आपले अर्ज सादर केले. त्यातील पाच उमेदवारांनी ३१ जानेवारीला माघार घेतल्याने, पुढची प्रक्रिया केवळ नाममात्र ठरली आहे. १९ पदे आणि १९ उमेदवार असल्याने, ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. त्यामुळे आता नाट्य परिषदेने नेमलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून निश्चित उमेदवारांची यादी मध्यवर्तीकडे पाठविली जाणार आहे. मध्यवर्तीकडून निरीक्षक पाठविल्या जाईल आणि ९ फेब्रुवारीला औपचारिकता पार पाडून केवळ पदांच्या नेमणुका तेवढ्या ठरविल्या जातील. एकंदर नागपूर शाखेची नवी कार्यकारिणी ९ फेब्रुवारीला ठरणार आहे.विरोधक गायब!निवडणूक घेतली जात नाही, विद्यमान कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची मनमर्जी चालते वगैरे तक्रारी मध्यवर्तीपर्यंत पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, निवडणूक लागल्यावर विद्यमान कार्यकारिणीच्या विरोधात एकही उमेदवार उतरलेला नाही. त्यामुळे, केवळ तक्रारीच करायच्या का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मैदानात प्रत्यक्ष उतरण्याची वेळ येते तेव्हा नाट्य परिषदेतील विरोधक गायब झालेले असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
नागपूर शाखेच्या नाट्य परिषदेची निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 7:52 PM
अपेक्षेप्रमाणेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या २४ पैकी ५ उमेदवारांनी अखेरच्या दिवशी माघार घेतल्याने, ९ फेब्रुवारीला केवळ औपचारिकता पार पाडली जाईल.
ठळक मुद्देपाच उमेदवारांची माघार : ९ फेब्रुवारीला ठरणार कार्यकारिणी