नागपूर : स्वस्त दरात सोने विकण्याचे आमिष दाखवत कोलकात्यातील दोन कंपन्यांकडून नागपुरातील एका सराफा व्यापाऱ्याची तब्बल ४ कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. संबंधित कंपन्यांनी व्यापाऱ्याकडून पूर्ण रक्कम ॲडव्हान्स स्वरुपात घेतली व त्यानंतर सोने पाठविण्यास तब्बल सहा वर्षे टाळाटाळ केली. आताच्या बाजारभावाशी तुलना केली असता यात व्यापाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात दोन्ही कंपन्यांचे संचालक व अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशुतोष नटवर मुंदडा (३८, रा रामदास पेठ) असे संबंधित व्यापाऱ्याचे नाव आहे. कोलकाता येथील जी. के. ट्रेक्सिम प्रा. लि. व बंका बुलियन्स प्रा. लि. या कंपन्यांनी त्यांना गंडा घातला आहे. या कंपन्यांचे संचालक गोपालकृष्ण बंका, राघव बंका, आर. के. बंका, ए. के. बंका, योगेश बंका, राहुल बंका अशी आरोपींची नावे असून, सर्वजण कोलकाता येथील निवासी आहेत.
मुंदडा यांच्याशी २०१६ गोपालकृष्ण बंकाने संपर्क साधला. सोन्याच्या विक्रीसाठी एक प्रस्ताव असल्याचे म्हणत बंकाने भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. बंका काही दिवसांतच मुंदडा यांना भेटला. त्याने दोन्ही कंपन्या सोने विक्रीत काम करत असल्याचे सांगत स्वस्त दरात सोने विकत देऊ असे सांगितले. मुंदडा यांना सर्व पैसे ॲडव्हान्स स्वरुपात द्यावे लागतील, असेदेखील त्याने सांगितले. मुंदडा यांना त्यावेळचे सोन्याचे भाव लक्षात घेता हा सौदा पटला व त्यांनी दोन्ही कंपन्यांना ४.३१ कोटी रुपये पाठविले. त्या बदल्यात बंका सोन्याच्या पट्ट्या, टॅक्स पावत्या, डिलिव्हरी नोट्स व देयके पाठविणार होता. प्रत्यक्षात त्याने यापैकी काहीच पाठविले नाही.
काही दिवसांनी बंकाने ३० लाख रुपये किमतीचे सोने पाठविले. उर्वरित सोन्याबाबत विचारणा केली असता सर्व संचालक दरवेळेला काही ना काही नवीन कारणे द्यायचे. अखेर मुंदडा यांनी ४ कोटींची रक्कम परत करण्याची विनंती केली. मात्र, कोरोना व इतर कारणे देत आरोपींनी परत टाळाटाळ केली. कंपनीचे संचालक फसवणूक करत असल्याची बाब लक्षात आल्यावर मुंदडा यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करत आपबिती मांडली. यानंतर बजाजनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी सहाही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. मुंदडा यांनी घटनेला दुजोरा दिला असून, जास्त बोलण्यास असमर्थता दर्शविली. या प्रकरणात नेमकी कारवाई काय झाली याची माहिती घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठलसिंह राजपूत यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
मोठ्या व्यक्तींची नावे सांगत दिशाभूल
मुंदडा यांच्याशी प्राथमिक बोलणे सुरू असताना बंकाने त्यांना प्रभावित करण्याचे खूप प्रयत्न केले. दोन्ही कंपन्या या देशातील नामांकित कंपन्या असून, अनेक मोठे क्लायन्ट जुळले असल्याचा दावा बंकाने केला होता. यावेळी त्याने सराफा बाजारातील मोठी नावेदेखील घेतली. यामुळे मुंदडा यांचा विश्वास बसला. २०१६ मध्ये सोन्याची किंमत ३० हजार रुपये तोळा इतकी होती. मुंदडा यांना ४ कोटींत मोठ्या प्रमाणावर सोने विकत घेता आले असते. मात्र, आरोपींकडे रक्कम दिली गेल्यामुळे त्यांचे पैसे अडकले.