नागपूर : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने २०२१-२२ चा राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
दिव्यांगांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी वर्ष २०२१-२२ चे राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यात नागपूरचे उद्योजक जयसिंग चव्हाण यांना सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्तीच्या श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. चव्हाण हे ८७ टक्के अस्थिव्यंग आहेत. त्यांनी वित्त विषयात एमबीए केले आहे. रंजना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज प्रा. ली.चे ते संचालक आहेत. त्यांनी आतापर्यंत २०० पेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यापूर्वी २००७ मध्ये त्यांना उत्कृष्ट दिव्यांग स्वयंउद्योजक या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.