बुटीबोरी : नागपूर मेट्रोचा विस्तार बुटीबोरीपर्यंत होईलच. यासोबतच येत्या सहा महिन्यांत नागपूर- बुटीबोरी मार्ग ६ पदरी करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केली.
बुटीबोरी उड्डाणपुलाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. याप्रसंगी खा. कृपाल तुमाने, खा. विकास महात्मे, आ. समीर मेघे, आ. गिरीश व्यास, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, माजी आ. सुधीर पारवे, माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, नगराध्यक्ष बबलू गौतम आदी उपस्थित होते.
बुटीबोरी ही राज्यातील आदर्श नगर परिषद बनावी या दृष्टीने एक विकास आराखडा तयार केला जावा. विकासासाठी हे शहर दत्तक घेणार, असे गडकरी म्हणाले. बुटीबोरी येथे १०० बेडचे राज्य विमा कामगार रुग्णालय लवकरच सुरू होईल, असे सांगताना यासंदर्भातील अडचणी सोडविण्यात येतील, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.
नाग नदी सौंदर्यीकरणासाठी २,२०० कोटी खर्च करण्यात येत आहेत. येत्या ५ वर्षांत नागपूरची ग्रीन सिटी, अशी ओळख निर्माण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. बुटीबोरीतही व्हेंटिलेटर्ससह सर्व सुविधायुक्त आदर्श हॉस्पिटल तयार करण्यात यावे, यासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
...असा आहे उड्डाणपूल
बुटीबोरी उड्डाणपुलावर ६९.२७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. डिसेंबर २०१८ मध्ये हे काम सुरू झाले होते. बुटीबोरी टी जंक्शनला राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची व स्थानिक बुटीबोरी येथून येणारी व एमआयडीसी क्षेत्रातून येणारी जड वाहनांची वर्दळ असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. ती आता होणार नाही. १.६९ कि.मी.चा हा सहा पदरी उड्डाणपूल आहे.