- नरेश डोंगरे नागपूर : लष्करात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी एका राजकीय पक्षाच्या कामठीतील एका स्थानिक नेत्यासह दोघांना केंद्रीय गुन्हे अण्वेषण (सीबीआय)ने ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री ही कारवाई झाल्याचे चर्चा आहे. या संबंधाने अधिकृत माहिती न मिळाल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री १० च्या सुमारास सीबीआयचे पथक कामठी कन्टोनमेंट परिसरातील एका व्यक्तीकडे पोहचले. त्यांनी तेथे चाैकशी करून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. याच पथकातील काही जणांनी न्यू येरखेडा परिसरातीलही दुसऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. प्राथमिक चाैकशीनंतर हे पथक दोघांना घेऊन कामठीतून निघून गेले. मात्र, त्यानंतर कामठीसह नागपुरातही उलटसुलट चर्चेला उधाण आले. सैन्य दलाच्याप पेपर फूट प्रकरणात तसेच नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी चाैकशी करून कामठीतील व्यक्तीचे घर सील करण्यात आले, अशीही चर्चा होती.
या संबंधाने शहानिशा करण्यासाठी लोकमत प्रतिनिधीने सीबीआयच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या कारवाईला दुजोरा मिळाला नाही. दुसरे म्हणजे, ही कारवाई सीबीआयच्या स्थानिक पथकाने केली की बाहेरून पथक आले, त्याबाबतही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.