नागपूर: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने (आयसीएआय) सीए इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी ऑनलाइन जाहीर केला. आयसीएआयच्या पश्चिम विभागांतर्गत कार्यरत नागपूर सेंटरचा सीए अंतिम परीक्षेचा निकाल १६.७० टक्के लागला असून दोन्ही ग्रुपची परीक्षा देणाऱ्या एकूण ४४९ पैकी केवळ ७५ विद्यार्थी अर्थात १६.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
देशात सर्वात कठीण समजली जाणारी ही परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे देशविदेशात वर्षातून दोनदा घेण्यात येते. आकडेवारीनुसार दोन्ही ग्रुपच्या परीक्षेत बसणाऱ्या एकूण ४४९ विद्यार्थ्यांपैकी पहिल्या ग्रुपमध्ये ३० आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये ८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याशिवाय केवळ पहिल्या ग्रुपची परीक्षा देणाऱ्या ४४९ विद्यार्थ्यांमध्ये १०३ आणि दुसऱ्या ग्रुपची परीक्षा देणाऱ्या २१० विद्यार्थ्यांमध्ये ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
नागपूर सेंटरवर अंतिम परीक्षेत दोन्ही ग्रुप, पहिला ग्रुप आणि दुसऱ्या ग्रुपची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची एकत्रित आकडेवारी ११०८ एवढी असून त्यापैकी केवळ ३७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.