Nagpur Central Assembly Bunty Shelke Pravin Datke: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. पाच दिवसांत प्रचाराच्या तोफा शांत होतील. त्यामुळे उमेदवार पायाला भिंगरी बांधून फिरताना दिसत आहेत. नागपूरमध्ये तर काँग्रेस उमेदवार प्रचार करत भाजपच्या कार्यालयात जाऊन पोहोचला. काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चर्चेचा विषय ठरला आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचाराला जोर आला असून, प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या अवलंबताना दिसत आहे. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात बंटी शेळके हे काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपने प्रवीण दटके यांनी रिंगणात उतरवले आहे.
बंटी शेळके प्रवीण दटकेंच्या प्रचार कार्यालयात
काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बंटी शेळके प्रचार करत विरोधी उमेदवार प्रवीण दटके यांच्या कार्यालयात पोहोचले. बंटी शेळके यांनी प्रचार कार्यालयातील कार्यकर्त्यांची गळाभेट घेतली. त्यांच्या या प्रचाराची चर्चा होत आहे.
बंटी शेळके यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, "माझी लढाई कोणत्याही व्यक्तीसोबत नाही, तर विचारांशी आहे. नागपूर मध्य असो किंवा नागपूर शहरातील नागरिक, मग तो कोणत्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा असो, प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझा संकल्प आहे की, मी प्रत्येक व्यक्तीसाठी हजर राहणार आणि सेवा करणार."
बंटी शेळके हे युवक काँग्रेसमध्ये कार्यरत होते. नंतर ते राष्ट्रीय सरचिटणीस बनले. बंटी शेळके यांचे वडील बाबा शेळके हे घंटानाद या संघटनेच्या माध्यमातून राजकारण आणि समाजकारणात होते.