लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यामुळे कारागृहापर्यंतचा प्रवास झालेला, मात्र त्या बंदिवानांमध्येही कलागुण असतात. काहींमध्ये ते अंशत: असतात, काहींमध्ये उपजतच असतात. त्या सर्वांना तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन देऊन वेगवेगळ्या वस्तू तयार करून घेण्यात आल्या. त्यात लहान मुलांच्या पाळण्यापासून तर सतरंजी, की पॉटपर्यंतच्या सर्वच वस्तूंचा त्यामध्ये समावेश आहे. या वस्तूंचे प्रदर्शन नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील बंदी विक्री केंद्रात लावण्यात आले आहे. आकर्षक अशा त्या वस्तू पाहून सर्वसामान्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कारागृह उपमहानिरीक्षक (पूर्व विभाग) योगेश देसाई यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी कारागृह अधीक्षक (प्रभारी) अनुपकुमार कुमरे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी वानखेडे, रजनलवार, मिरासे, कारखाना व्यवस्थापक तथा प्रशिक्षक आडे यांची प्रमुख उपस्थिती होती.बंदिवान म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र उभे राहते. एवढेच काय तर हेच बंदिवान कारागृहातून बाहेर पडल्यावर त्यांना समाजाच्या विखारी नजरांचा सामना करावा लागतो. त्यांना कामही भेटणे कठीण होते. अशात त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे ‘सुधारणा व पुनर्वसन’ या कारागृहाच्या ब्रीदवाक्यानुसार बंदिवानांना वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. काही प्रमाणात ते तरबेज होतात, काही बंदिवान तर पारंगतही होतात. याच आधारावर ते कारागृहातून बाहेर पडल्यावर उपजीविकेचे साधन बनवितात.ना नफा; ना तोटाबंदिवानांनी तयार केलेल्या अशा वस्तूंचे प्रदर्शन यावर्षीही लावण्यात आले. याचे औपचारिक उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. बंदिवानांनी तयार केलेल्या या वस्तू ‘ना नफा; ना तोटा’ या तत्त्वावर बंदी विक्री केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मुलांचे पाळणे, चादरी, सतरंजी, विविध प्रकारातील पणत्या, की पॉट, पायदान, विविध प्रकारच्या सिनरी यासह इतर वस्तूंचा समावेश आहे.