- नरेश डोंगरे नागपूर - गेल्या सप्टेंबर महिन्यात विविध साहित्य आणि खनिजांची मालवाहतूक करून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने तब्बल ३०४.२१ कोटी रुपयांची कमाई केली. कोळशाच्या मालवाहतुकीतून रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न मिळाले.
मध्य रेल्वेने गेल्या काही महिन्यात प्रवासी वाहतूकींसोबतच मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. नागपूर-विदर्भात कोळसा, सिमेंट आणि लोह खनिजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर वर्षभरात आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे रेल्वेला मालवाहतुकीतून घसघशीत कमाई होऊ लागली आहे. एकेका महिन्यात शेकडो कोटींची कमाई, करून रेल्वेच्या अन्य विभागाचे मध्य रेल्वेने लक्ष वेधले आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात ७९४ रॅकची वाहतूक करून ३०४ कोटी, २१ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यापैकी सर्वाधिक २३०.१५ कोटींची कमाई कोळसा वाहतूकीतून झाली आहे. महिनाभरात कोळशाच्या ५७० रॅक रेल्वेने लोड केल्या आहेत. त्यापाठोपाठ लोह खनिजांच्या वाहतूकीतून २९.८५ कोटींची कमाई केली आहे. देशाच्या कोणत्याही प्रांतात मालवाहतूक करण्यासाठी नागपूर विभाग सज्ज असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सिमेंट अन् अन्नधान्याचाही आधारमध्य रेल्वेच्या तिजोरीत सिमेंट वाहतुकीतून १८.८८ कोटी तर स्टील वाहतुकीतून ९३ लाख रुपये जमा झाले आहे. अन्नधान्याच्या वाहतूकीतून १.९३ कोटी रुपये, फेरो मॅगनीज ८० लाख, फ्लाय एश १.५३ कोटी, आर्यन स्लॅग ५१ लाख, ट्रॅक्टर ४४ लाख तसेच जेसीबीसह अन्य ऑटोमोबाईल सेक्टरच्या वाहतुकीतून रेल्वेला ६ लाखांची कमाई झाली आहे.