आॅनलाईन लोकमतनागपूर : अभियांत्रिकीला प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून तिघांनी एका विद्यार्थिनीकडून ७५ हजार रुपये उकळले. तिला प्रवेश मिळाल्याची बनावट पावतीही दिली. महाविद्यालयात पोहचल्यानंतर ती पावती बनावट असल्याचे आणि आरोपींनी फसवणूक केल्याचे उघड झाल्यामुळे पीडित विद्यार्थिनीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.ओमकार पिंपळापुरे, दिनेशसिंग बैस आणि तुषार अशी आरोपींची नावे आहेत. ते नेमके कुठे राहतात, याबाबत पोलिसांकडे माहिती नाही. फिर्यादी प्रिया राजू बनकर (वय २१) ही मानेवाड्यात राहते. तिला यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय हिंगणा येथे प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी प्रियाने जुलै महिन्यात तिच्या मैत्रिणींकडे विचारणा केली. एका मैत्रिणीने आरोपींसोबत ओळख करून दिल्यानंतर त्यांनी प्रवेश घेण्यासाठी ७५ हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. त्यानुसार, पिंपळापुरे, बैस आणि तुषार या तिघांना तीन टप्प्यात ७४,८०० रुपये दिले. आरोपींनी प्रियाला महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाल्याची बनावट पावती दिली. ती घेऊन प्रिया महाविद्यालयात गेली असता पावती बनावट असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने प्रियाला सांगितले. आरोपींनी फसवणूक केल्याची बाब प्रियाने आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर आरोपींशी संपर्क केला असता त्यांनी पैसे परत करतो, असे सांगून प्रियाला वेगवेगळ्या रकमेचे दोन चेक दिले. मात्र, बँकेतील खात्यात रक्कम नसल्यामुळे हे चेक बाऊन्स झाले. परिणामी प्रियाने शुक्रवारी सायंकाळी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. सहायक पोलीस निरीक्षक हनवते यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
नागपुरात अभियांत्रिकीला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनीला फसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 11:18 PM
अभियांत्रिकीला प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून तिघांनी एका विद्यार्थिनीकडून ७५ हजार रुपये उकळले.
ठळक मुद्देबनावट पावती दिली : ७५ हजार उकळले