आशिष साैदागर
कळमेश्वर (नागपूर) : शहरालगत वाहणाऱ्या खडक नदीत एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी साेडले जात असल्याने ही नदी दूषित झाली आहे. नदीतील माशांसह इतर जलचर प्राणी मृत्युमुखी पडले असून, या दूषित पाण्याचा मानवी व जनावरांच्या आराेग्यावर घातक परिणाम हाेण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकाराकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केल्याचा आराेप कळमेश्वर शहरातील नागरिकांनी केला आहे.
ब्राह्मणी गावाचा समावेश कळमेश्वर नगरपालिकेत करण्यात आला आहे. या गावालगत खडक नदी वाहते. मागील काही महिन्यांपासून या नदीतील पाण्याचा रंग काळाशार पडायला सुरुवात झाली. त्यातच नदीच्या पाण्यात माेठ्या प्रमाणात मृत मासे व इतर जलचर प्राणी आढळू लागल्याने या नदीतील पाणी दूषित झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.
कळमेश्वर शहरालगतच्या औद्याेगिक वसाहतीतील कारखान्यांमधील रसायनयुक्त पाणी प्रक्रिया न करता उघड्यावर साेडले जात असल्याने या भागातील जमिनीतील पाणीही दूषित झाले आहे. त्यामुळे कळमेश्वर शहरातील सर्वच जलस्राेत निकामी झाले असून, शहराला गेल्या ३० वर्षांपासून बाहेरील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. आता खडक नदीतील पाणी दूषित झाल्याने कळमेश्वर शहरासाेबतच तालुक्यातील काही गावे पाण्याच्या बाबतीत परावलंबी हाेणार आहेत.
या दूषित पाण्यामुळे हाेणारे गंभीर व दूरगामी परिणाम टाळण्यासाठी यावर राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळीच याेग्य उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी ब्राह्मणी येथील अनुजा निंबाळकर, वरोडा येथील शेतकरी बंडू ढवळे, नरेश राऊत, राजू काकडे, प्रशांत डाखोळे, ईश्वर पारसे, दामोदर राऊत यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
जलस्राेत निकामी हाेणार
खडक नदी ब्राह्मणी शिवारातून पुढे कळमेश्वर तालुक्यातील वरोडा, झुनकी, सावळी (बु.), बोरगाव (खुर्द), ब्रह्मपुरी शिवाराकडे वाहत जाते. नदीतील रसायनयुक्त पाणी जमिनीत माेठ्या प्रमाणात झिरपत असून, ते या गावांसह शेतीतील विहिरींमध्ये जमा हाेते. पाण्याची चाचणी करण्यात न आल्याने या पाण्यात नेमके काेणते घातक घटक मिसळले आहेत, याबाबत कुणालाही माहिती नाही. त्यामुळे नदीच्या परिसरातील जलस्राेत कायमचे निकामी हाेण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
माणसांसह जनावरांचे आराेग्य धाेक्यात
जनावरे व इतर जनावरे याच नदीच्या पात्रातील पाणी पितात. विहिरींमध्ये नदीतील रसायनयुक्त पाणी झिरपते, त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी केल्यास शेतजमिनीचा पाेत कायम खराब हाेऊन या शिवारातील शेतजमिनी नापीक हाेण्याची तसेच विहिरींमधील दूषित पाणी प्यायल्याने माणसांसह जनावरांच्या जीवितास धाेका उद्भवण्याची शक्यता जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे. या दूषित पाण्यामुळे चर्मराेग हाेण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली.