नागपूर: इंडिगो एअरलाइन्स महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरसाठी नागपुरातून २ जुलैपासून नवीन उड्डाण सुरू करीत आहे. येथील उड्डाण गोव्यालाही जोडले जाईल. विशेष म्हणजे पावसाळा हा विमान कंपन्यांसाठी ‘लीन सीझन’ मानला जातो. त्यामुळे याच मोसमात ही विमानसेवा सुरू करण्यात येत आहे.
६इ-७४६७ छत्रपती संभाजीनगर-नागपूर हे विमान सायंकाळी ४.४० वाजता निघून ६.१० वाजता नागपुरात पोहोचेल. तर ६इ-७४६२ नागपूरहून सकाळी ९.४० वाजता सुटेल आणि ११ वाजता छत्रपती संभाजीनगरला पोहोचेल. हेच विमान सकाळी ११.३० वाजता छत्रपती संभाजीनगरहून गोव्यासाठी रवाना होईल. ६इ-७४६७ हे विमान गोव्याहून छत्रपती संभाजीनगरसाठी दुपारी २.१० वाजता सुटेल. ही उड्डाणे आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवार उपलब्ध असतील. या उड्डाणासाठी ७२ सीटांचे एटीआर विमान चालवण्यात येणार आहे.
इंडिगोचे ग्लोबल विक्री प्रमुख विनय मल्होत्रा म्हणाले, नागपूर, गोवा आणि छत्रपती संभाजीनगरला जोडण्यात कंपनीला आनंद होत आहे. व्यवसाय आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून छत्रपती संभीजीनगर महत्त्वाचे आहे. अंजटा-एलोराच्या लेण्यांशिवाय इथे अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. स्टार एअर कंपनी २६ जूनपासून नागपूर-नांदेड आरसीएस विमानसेवा सुरू करत आहे. नांदेड हे धार्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे शहर आहे. हे उड्डाणदेखील पावसाळ्यातच सुरू होत आहे. स्टार फ्लाइट एस५-२४७ नागपूर-नांदेड सकाळी ९.१५ वाजता आणि एस५-नांदेड-नागपूर दुपारी १.१० वाजता निघेल.