नागपूर : नागपूर छिंदवाडा आणि छिंदवाडा नागपूर ही रेल्वे लाईन ब्रॉडगेज झाली. मात्र, या मार्गावरच्या रेल्वेच्या फेऱ्या कमी झाल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या मार्गावरच्या रेल्वेच्या फेऱ्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांमार्फत केली जात आहे.
इतवारी छिंदवाडा आणि छिंदवाडा नागपूर ही रेल्वेलाईन आधी मीटर गेजची होती. त्यावेळी या मार्गावर रेल्वेगाडीच्या सहा फेऱ्या व्हायच्या. महाराष्ट्र-मध्य प्रदेश अशा दोन राज्यांना जोडणाऱ्या या रेल्वेमार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याचे ध्यानात घेऊन रेल्वे मंत्रालयाने नागपूर छिंदवाडा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज केला. त्यामुळे रेल्वेची गती वाढली असून, प्रवाशांनाही कमी वेळेत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जाणे-येणे सुलभ झाले आहे. मात्र, आता सहा ऐवजी दोनच रेल्वेगाडीच्या फेऱ्या होत आहेत.
विशेष म्हणजे, नागपूर छिंदवाडा मार्गावर अनेक शहर आणि रेल्वेस्थानक असलेली गावखेडी आहेत. या मार्गावरील स्थानकावर नागपूरकडे येणाऱ्या आणि छिंदवाडाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे या दोन्ही फेऱ्यात प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. सकाळ सायंकाळ अशा दोनच रेल्वेगाड्या असल्याने अनेकांचे वेळेअभावी जाणे येणे होत नाही. त्यामुळे शेकडो प्रवासी जाण्या-येण्यासाठी ट्रॅव्हल्स, बस अथवा टॅक्सीचा पर्याय शोधतात. ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य आहे, ते हा पर्याय शोधतात. मात्र, ज्यांना शक्य नाही त्यांची मोठी कुचंबणा होते. त्यामुळे या मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी जोरदार मागणी रेल्वे प्रवाशांकडून होऊ लागली आहे.
साध्या धावणाऱ्या गाड्यांची वेळ
१) इतवारी नागपूर ते छिंदवाडा
ट्रेन क्रमांक ०८११९
सुटण्याची वेळ : सकाळी - ७.४५, पोहोचण्याची वेळ - ११.४०
२) ट्रेन क्रमांक ०८२६५
सुटण्याची वेळ : ३.३०, पोहोचण्याची वेळ - ९.५०
छिंदवाडा ते ईतवारी नागपूर
१) ट्रेन क्रमांक ०८२६६
सुटण्याची वेळ : सकाळी - ७, पोहोचण्याची वेळ - ११.२०
२) ट्रेन क्रमांक ०८१२०
सुटण्याची वेळ : १२.४०, पोहोचण्याची वेळ - ९.५०