- गणेश हूड
नागपूर - अतिक्रमण कारवाईत घरे उध्वस्त झालेल्यांना पुनर्वसनात घरे मिळावी. या मागणीसाठी हिंगणा तालुक्यातील वेणा येथील ग्रामस्थ मागील १० दिवसापासून संविधान चौकात आंदोलन करीत आहेत. परंतु शासनाने अद्याप या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. याचा निषेध म्हणून शुक्रवारी येथील विधान भवनाला पुजा- प्रदक्षिणा करून संविधान पठन आंदोलन करण्यात आले.
हिंगणा तालुक्यातील सातगाव वेणा येथे ग्रामपंचायतीने गावातील अतिक्रमण काढले. यात ३३६ घरे पाडण्यात आली. दरम्यान न्यायालयातून स्थगिती आल्याने ११५ घरे वाचली. अतिक्रमण कारवाई विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. यासाठी युवा परिवर्तन की आवाज या संघटनेच्या नेतृत्वात ग्रामस्थ १० दिवसापासून संविधान चौकात आंदोलनाला बसले आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधान भवनाला प्रदक्षिणा करून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
पंतप्रधानांनी २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली लोकांना बेघर केले जात आहे. बेघर करण्यात आलेल्यांना घरे देवून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. अशी मागणी आंदोलकांनी केली.
घरे तोडण्यात आलेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यात यावे. यासाठी मागील दहा दिवसापासून आंदोलन सुरू आहे. परंतु अद्यापही पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतलेली नाही. घरे उध्वस्त झालेल्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. यासाठी पुजा- प्रदक्षिणा करून संविधान पठन आंदोलन करण्यात आले. - निहाल पांडे, आंदोलक