लोकमत न्यूज नेटर्कनागपूर : काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने गटबाजी व पक्षविरोधी कारवाया सुरू आहेत. पक्षाच्या बळावर पदे भोगणारे वा निवडून येणारे बेशिस्त वागतात. निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना याचा फटका बसतो. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका विचारात घेता बेशिस्तांना चाप लावण्यासाठी पक्षात शिस्त असावी यासाठी शहर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत रविवारी शिस्तपालन आचारसंहिता लागू करण्याबाबतचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीने पक्षातून निष्कासित केले आहे. या निर्णयानंतर देवडिया काँग्रेस भवन येथे प्रथमच होणाऱ्या शहर काँग्रेसच्या बैठकीकडे सर्वांंचे लक्ष लागले होते. शहर काँग्र्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अ.भा.कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी,महाराष्ट्र कॉग्रेस कमिटीचे प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेश अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी शिस्तपालन करण्याच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयावर कार्यकारिणीत चर्चा करण्यात आली.पक्षातील सकारात्मक गटबाजी हे जिवंतपणाचे लक्षण आहे. परंतु पक्षाच्या संघटनेला महत्त्व न देता स्वत:च्या स्वार्थासाठी पक्षाला नुकसान करणारी बेशिस्त योग्य नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बळकट करण्यासाठी संघटनात्मक बांधणी सोबतच पक्षातील गटबाजी खपवून घेतली जाणार नसल्याची भमिका विकास ठाकरे यांनी मांडली.शहर उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, अॅड.अभिजित वंजारी, रमण ठवकर, उमेश शाहू, मुजीब भाई, जयंत लुटे, अनिल शर्मा आदींनी शिस्तपालन आचारसंहिंता लागू करण्यावर आपली भूमिका मांडली. सर्वानुमते हा ठराव पारित करण्यात आला. पक्षात शिस्त असावी यासाठी सर्वसंमतीने शिस्तपालन आचारसंहितेचा ठराव मंजूर करण्यात आला. प्रदेश काँग्रेसच्या मंजुरीनंतर व अखिल भारतीय काँग्रेसच्या अचारसंहितेनुसार या निर्णयाची अंमलबजावणी के ली जाणार असल्याची माहिती विकास ठाकरे यांनी दिली.