लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही दिवसांपूर्वी माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या गटाने दिल्लीवारी करीत लोकसभा निवडणुकीच्या तिकिटावर दावा केल्यानंतर विरोधी गटाने दिल्ली गाठण्याची तयारी केली. महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात शंभराहून अधिक कार्यकर्ते सोमवारी राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीला रवाना झाले. याची कुणकुण लागताच ठाकरे गट विमानाने मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा दिल्लीत दाखल होत असल्याने नागपूरकरांना काँग्रेसचा दिल्लीतील गोंधळ बघायला मिळणार आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने दिल्ली गाठून महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व ए. के.अॅन्थोनी, अहमद पटेल, मोतीलाल व्होरा व मुकुल वासनिक आदींच्या भेटी घेऊन नागपूर लोकसभा मतदार संघातील पक्षाचा उमेदवार शहर काँगे्रस कमिटीच्या मताने ठरविला जावा, गेल्या पाच वर्षांत पक्षाकडे पाठ फिरविणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका मांडली होती.दरम्यान, वनवे गटाने आमदार निवासात बैठक घेऊ न नागपूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसची उमेदवारी माजी मंत्री नितीन राऊ त, सतीश चतुर्वेदी, प्रफुल्ल गुडधे, माजी खासदार गेव्ह आवारी वा माजी आमदार अशोक धवड यांना देण्यात यावी. बडतर्फ सतीश चतुर्वेदी यांना पुन्हा काँग्रेस पक्षात घेण्यात यावे, अशा आशयाचा ठराव या बैठकीत पारित करण्यात आला होता.काँग्रेसच्या नवनियुक्त महासचिव प्रियंका गांधी यांचे अभिनंदन करण्यासाठी दिल्लीला जात असल्याचे तानाजी वनवे यांनी सांगितले. त्यांच्यासोबत कमलेश चौधरी, विजय बाभरे, यशंवत कुंभलकर, किशोर जिचकार, आयशाअन्सारी,मनोज गावंडे, जुल्फीकार भुट्टो यांच्यासह दीडशे कार्यकर्ते दिल्लीला निघाले आहेत.दरम्यान, नितीन राऊत, गेव्व्ह आवारी, अशोक धवड आधीच दिल्लीत दाखल झालेले आहेत. सतीश चतुर्वेदी दिल्लीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, नितीन राऊ त यांनी कार्यकर्ते दिल्लीत येत असल्याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले. अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष असल्याने देशभरातील जबाबदारी आहे. तूर्त नागपूर जिल्ह्यातील राजकारणापासून दूर आहे. परंतु रामटेक लोकसभा मतदार संघात राऊ त यांना उमेदवारी देण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी केली होती.विकास ठाकरे यांच्यासह अॅड. अभिजित वंजारी, अतुल लोंढे, उमकांत अग्निहोत्री, प्रशांत धवड, संदीप सहारे, मनोज सांगोळे, धरम पाटील ठाकरे गटातील १४ नगरसेवक यांच्यासह ९० हून अधिक पदाधिकारी मंगळवारी सकाळी दिल्लीला विमानाने रवाना होत आहेत. यात गेल्यावेळी गेलेल्या पदाधिकाऱ्यांसह नवीन पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती विकास ठाकरे यांनी दिली. दोन्ही गट दिल्लीत डेरेदाखल होत असल्याने गोंधळ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.