लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होत आहेत. परंतु नुसते प्रमुख रस्ते चकाचक झाल्याने शहराचा चौफेर विकास होणार नाही. उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध असणे तितकेच महत्त्वाचे आहे. जरीपटका भागातील रस्ते चांगले झाले आहे. परंतु लगतच्याच नारा घाटावरील सुविधांकडे मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. येथे मुतारीची व्यवस्था नाही. पाण्याचा नियमित पुरवठा होत नाही. लाकूड ठेवण्याच्या गोदामाचे छत जीर्ण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसात लाकडे ओली होतात. यामुळे अंत्यसंस्कार करताना लाकडे रॉकेल ओतूनही पेटत नाही. बाजूच्या नदीची भिंत तुटली असल्याने येथे डुकरांचा मुक्त संचार आहे. परिसराची स्वच्छता ठेवली जात नाही. घटावरील विहिरीत कचरा साचला आहे. विहीर स्वच्छ ठेवल्यास येथील पाण्याचा वेळप्रसंगी वापर करता येईल. पण याकडे दुर्लक्ष आहे. लगतच्या नारा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. गॅस गोडाऊन लगत वाहणाऱ्या नाल्याची सफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. नाल्याला संरक्षक कठडे नसल्याने रात्रीच्या अंधारात वाहन थेट नाल्यात पडून अपघाताचा धोका आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.
लाकडाच्या गोदामाचे छत जीर्ण
नारा घाटावर लाकूड ठेवण्यासाठी असलेल्या गोदामाचे टिनाचे छत जीर्ण झाले आहे. पावसाच्या पाण्याने लाकडे ओली होतात. अंत्यसंस्कार करताना मृतांच्या नातेवाईकांना त्रास होतो. ते तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे. येथे पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. गोदामाच्या बाजूला अंत्यसंस्कारासाठी असलेले लोखंडी छत जीर्ण झाल्याने वापरता येत नाही. त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. बाथरुमची व्यवस्था नाही. परिसरात नियमित साफसफाई होत नाही. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- कमल चूहडमल मोटवानी, महासचिव सिंधी पंचायत
बाथरुमची व्यवस्था करावी
नारा घाटावर अंत्यंसस्कारासाठी महिलाही येतात. येथे बाथरुमची व्यवस्था नसल्याने महिलांची कुचंबणा होते. घाटावर दर्शनीभागात सेवाभावी संस्थेने लावलेल्या नळांना पाणी राहत नाही, याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच संरक्षण भिंत दुरुस्तीची गरज आहे. परिसरात डागडुजी होणे गरजेचे आहे.
- रमेश खोब्रागडे
नारा रोडची दुरुस्ती नाही
नारा घाटापासून नारा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची मागणी काही वर्षांत दुरुस्ती झालेली नाही. गॅस गोडाऊन जवळ रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात येथे पाणी साचते. बाजूच्या नाल्याची साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. डासांचा त्रास वाढला आहे. तक्रार करूनही मनपा प्रशासन याकडे लक्ष देत नाही.
-कमल मोहिया
नाल्याला कठडे नसल्याने अपघाताचा धोका
गॅस गोडाऊन लगत वाहणाऱ्या नाल्याला संरक्षक कठडे नसल्याने रात्रीच्या अंधारात अपघात होण्याचा धोका आहे. पावसाळाच्या दिवसात नाल्याला पूर आल्यास आजूबाजूला पाणी साचते. येथील रस्त्याची मागील ८-१० वर्षात दुरुस्ती झालेली नाही. धुळीमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. यासंदर्भात तक्रार करूनही मनपा प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.
- विजय सिंग
डुकरांचा त्रास
नारा परिसरातून वाहणारी पिवळी नदी व तीन नाल्यांची साफसफाई होत नसल्याने डुकरांचा मुक्त संचार आहे. यामुळे आजूबाजूच्या वस्त्यातील नागरिकांना त्रास होतो. डुकरांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात अनेकदा तक्रारी केल्या परंतु मनपा प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.
जागोजागी कचरा साचून
पसिरात दररोज कचरा उचलला जात नाही. पिवळी नदीकाठावर निरुपयोगी मटेरियल टाकले जाते. रस्त्याच्या बाजूला ठिकठिकाणी कचरा साचून आहे. यामुळे नागरिकांना त्रास होतो. या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यासाठी नियमित फवारणीची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.
नाल्याला संरक्षण भिंत नाही
नारा परिसरातून वाहणाऱ्या नाल्याला संरक्षण भिंत नाही. पावसाळ्याच्या दिवसात वस्त्यात पाणी शिरते. संरक्षण भिंतीची वेळोवेळी मागणी करण्यात आली. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. संरक्षण भिंत नसल्याने परिसरातील कचरा नाल्यात टाकला जातो. यामुळे दुर्गंधी पसरते.