लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात बुधवारी हवामानाचा अंदाज बदललेला दिसून आला. दिवसाचे कमाल तापमान २.१ अंशाने घटून २९.४ अंशावर पाेहचले. मात्र रात्रीच्या किमान तापमानात २.३ अंशाची वाढ हाेऊन ताे १७.१ अंशावर पाेहचला. तापमानात चढ-उतार हाेत असल्याने नागरिकांचा त्रास वाढला. रात्री वाहणाऱ्या थंड हव्याने नागरिकांना हुडहुडी भरवली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढचे दाेन दिवस आकाशात ढग दाटलेले असतील. त्यानंतर वातावरण काेरडे हाेऊन तापमानात घट हाेण्याचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत असतानाही मध्य भारतात त्याचा प्रभाव दिसून आला नाही. नागपुरात सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ६३ टक्के हाेती, जी सायंकाळी कमी हाेऊन ५५ टक्क्यांवर पाेहचली. दिवसा ढगाळ वातावरण हाेते. कमाल तापमान सामान्यपेक्षा १ अंशाने घटल्याने थंडीचा प्रभाव जाणवत हाेता. विदर्भात आजही गाेंदियात सर्वात कमी १३.५ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली.