लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज पोलीस दलातही महिलांचा बोलबाला होता. ठिकठिकाणी महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सत्कार झाले. तर, काही ठिकाणी महिलांच्या हाती एक दिवसांपुरते का होईना मात्र ठाणेदार म्हणून सर्वाधिकार देण्यात आले.पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मेट्रोच्या वरिष्ठांशी चर्चा करून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ‘महिला स्पेशल मेट्रो सफर’ घडवून आणली. यात सहभागी झालेल्या महिलांचे मुंजे चौकातील मेट्रो स्थानकात दुपारी ३ वाजता डॉ. उपाध्याय यांनी स्वागत केले. तहसील सह अनेक पोलीस ठाण्यात महिलांच्या हाती ठाणेदार म्हणून आज धुरा देण्यात आली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अनेक महिला अधिकाऱ्यांनी एक दिवस ठाणेदार म्हणून जबाबदारी सांभाळली.पोलीस आयुक्तालयात दुपारी ४ वाजता कर्तबगार महिला पोलिसांचा सत्कार करण्यात आला. जनसामान्यांची मदत करण्यासाठी तत्परता दाखवणाºया नियंत्रण कक्षातील तसेच आयुक्तालयातील विविध विभागात कार्यरत महिला पोलिसांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. त्यांना पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सहायक पोलीस आयुक्त भवरे, पोलीस निरीक्षक सांदिपान पवार यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाचे संचलन आणि आभारप्रदर्शन उपायुक्त गजानन राजमाने यांनी केले.