सुमेध वाघमारे नागपूर : पैसे घेऊन बदली करण्याच्या प्रकरणाची शहर पोलिसांनी ‘एसआयटी’मार्फत चौकशी करून शहर आणि ग्रामीण आरटीओमधील वादग्रस्त तीन अधिकाऱ्यांची बदली केली. हे प्रकरण ताजे असताना सोमवारी या दोन्ही आरटीओचा भार अमरावतीच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांच्याकडे सोपविण्यात आल्याने खळबळ उडाली.
परिवहन विभागात कालबद्ध पदोन्नती न देता एकाच अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा जास्त आरटीओ कार्यालयाचा भार सोपविला जात आहे. यामुळे आरटीओचा उद्देशावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. गडचिरोली आरटीओ कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी ग्रामीण आरटीओ कार्यालयाचा पदभार सोपविण्यात आला. तर पूर्व नागपूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार यांच्याकडे शहर आरटीओ कार्यालयाचा पदभार सोपविण्यात आला. दोन्ही कार्यालयात विकासात्मक कामांना वेग येत असतानाच सोमवारी या दोन्ही अधिकाऱ्यांकडून शहर व ग्रामीण आरटीओचा पदभार काढून घेण्यात आला. त्यांच्या जागी अमरावती आरटीआचे परिवहन अधिकारी राजभाऊ गिते यांच्याकडे सोपविण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.