नागपूर : नागपूर शुक्रवारी विदर्भातील सर्वाधिक थंड शहर ठरले. नागपूरच्या तापमानाचा पारा २४ तासांत ४.३ डिग्री सेल्सिअसने घसरून १४.३ डिग्री सेल्सिअसवर स्थिरावला. इतर सर्व शहरांतील तापमान यापेक्षा जास्त होते.
हवामान विभागानुसार, पुन्हा येत्या दोन दिवसांपर्यंत पारा सामान्य स्तरापेक्षा खाली राहील. त्यामुळे रात्री थंडीची जाणीव होईल. परंतु, दिवसभर ऊन पाहायला मिळेल. गेल्या २४ तासांत विदर्भातील जिल्ह्यांमध्ये रात्रीचे तापमान २ ते ६ डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरले. त्यामुळे थंडीचा प्रभाव जाणवला.
यवतमाळ दुसऱ्या क्रमांकाचे थंड शहर ठरले. येथील तापमान १४.५ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. ब्रह्मपुरी येथे १४.९, अमरावती येथे १५.१, बुलडाणा येथे १५.२ तर वर्धा येथे १५.८ डिग्री तापमान नोंदविण्यात आले. चंद्रपूर येथे किमान तापमान १९.२ डिग्री सेल्सिअस होते. हे तापमान विदर्भात सर्वाधिक आहे. याशिवाय दक्षिण-पश्चिम बंगालची खाडी ते श्रीलंकापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. परिणामी, दक्षिण भारतात पाऊस पडण्याची शक्यताही आहे.