सोनिया, राहुल गांधींना हात लावाल तर विदर्भ पेटवू, काँग्रेस नेत्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 06:30 PM2022-06-13T18:30:31+5:302022-06-13T18:54:54+5:30

nagpur congress agitation : जेव्हा भाजप घाबरते तेव्हा ईडीला समोर करते, असा आरोप करीत ईडीने सर्वप्रथम भाजप नेते व मंत्र्यांची संपत्ती तपासावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.

nagpur congress agitation in front of ED office, minister nitin raut, vijay wadettiwar Police Custody | सोनिया, राहुल गांधींना हात लावाल तर विदर्भ पेटवू, काँग्रेस नेत्यांचा इशारा

सोनिया, राहुल गांधींना हात लावाल तर विदर्भ पेटवू, काँग्रेस नेत्यांचा इशारा

Next
ठळक मुद्देकाँग्रेसची नागपूर ईडी कार्यालयावर धडक राऊत, वडेट्टीवार, ठाकरे पोलिसांच्या ताब्यात

नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांना राजकीय द्वेषातून ईडीची नोटीस पाठविली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना नोटीस पाठविली जात असेल तर खासदार, आमदारांना किती धमकावले जात असेल याचा अंदाज येतो. मात्र, काँग्रेसजन अशा नोटिशींना घाबरणार नाही. दडपशाहीसमोर झुकणार नाही. ज्येष्ठ नेत्यांना ईडीच्या माध्यमातून हात लावला तर विदर्भ पेटवून सोडू, असा इशारा काँग्रेस नेत्यांनी सोमवारी दिला.

नागपुरातील ईडी कार्यालयासमोर काँग्रेसने धरणे दिले. या आंदोलनात ऊर्जामंत्री नितीन राऊत, ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी मंत्री सुनील देशमुख, शिवारीजाराव मोघे, वसंत पुरके, आ. सुभाष धोटे, आ. अभिजित वंजारी, आ. प्रतिभा धानोरकर, आ. अमित झनक, आ. सहसराम कोरटे, आ. राजू पारवे, प्रकाश तायडे, ॲड. शोएब खान, कुणाल राऊत, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, रश्मी बर्वे, नॅश अली, कुंदा राऊत यांच्यासह विदर्भातील काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यकर्ते जोशात भाजपविरोधात घोषणाबाजी करीत होते.

भाजप नेते, मंत्र्यांची संपत्ती तपासा

काँग्रेस नेत्यांना ईडीच्या नोटीस पाठवून, धाडी घालून भीती दाखवितात. सौदेबाजी करतात. भाजपमध्ये गेले की कारवाई आपोआप थांबते. कृपाशंकर सिंह, हर्षवर्धन पाटील यांसारखे नेते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले व पवित्र झाले. जेव्हा भाजप घाबरते तेव्हा ईडीला समोर करते, असा आरोप करीत ईडीने सर्वप्रथम भाजप नेते व मंत्र्यांची संपत्ती तपासावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.

आ. ठाकरे ईडी कार्यालयाच्या गेटवर चढले

धरणे आंदोलनानंतर आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी नारेबाजी करीत ईडी कार्यालयाकडे कूच केले. ईडी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते व तगडा पोलीस बंदोबस्त होता. ठाकरे हे नारेबाजी देत ईडी कार्यालयाच्या गेटवर चढले. त्यांच्या पाठोपाठ कार्यकर्तेही सरसावताच पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले. त्यांनी आ. ठाकरे यांना खाली खेचत ताब्यात घेतले. यावेळी जोरदार घोषणाबाजी होऊन तणाव निर्माण झाला.

काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले

आंदोलनादरम्यान पोलिसांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत, ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, गिरीश पांडव, प्रशांत धवड यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत पोलीस मुख्यालयात रवाना केले. कार्यकर्त्यांनी पोलीस व्हॅनच्या समोर आडवे येत रस्ता रोखून धरला. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर कार्यकर्त्यांना पांगविले.

Web Title: nagpur congress agitation in front of ED office, minister nitin raut, vijay wadettiwar Police Custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.