Nagpur Congress | काँग्रेस अध्यक्ष बदलाचे वारे; पण ‘जैसे थे’मुळे विरोधक हिरमुसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2022 01:18 PM2022-08-26T13:18:56+5:302022-08-26T13:19:50+5:30
प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत चर्चाही नाही, गणेशोत्सवापूर्वी बदलाचा विरोधकांचा दावा
नागपूर : काँग्रेसचेनागपूर शहर व ग्रामीणचे अध्यक्ष बदलले जातील, असे राजकीय वारे वाहण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मात्र, बुधवारी मुंबईत झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत विषय पत्रिकेत यासंदर्भातील विषय असतानाही साधी चर्चाही झाली नाही. त्यामुळे विरोधी गटाच्या पदरी निराशा आली आहे. असे असले तरी कार्यकर्ते एकमेकांना फोन करून नव्या अध्यक्षांची नावे निश्चित झाली असून, गणेशोत्सवापूर्वी जाहीर होतील, अशी चर्चा करीत आहेत.
काँग्रेसच्या जयपूर येथील शिबिरात झालेल्या ठरावाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय मंथन शिबिरात पदावर पाच वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींचे राजीनामे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नागपूरचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी आपले राजीनामे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्याकडे सोपविले होते. मात्र, पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका सुरू असल्याचे तसेच महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याचे कारण देत या दोन्ही अध्यक्षांना पुढील निर्णय होईपर्यंत काम सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
यानंतर जुलै महिन्यात महापालिकेचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यासह नाराज गटातील नेत्यांनी दिल्ली गाठत नेत्यांची भेट घेतली व संघटनात्मक निवडणुका घेण्याची तसेच नव्या अध्यक्षांची निवड त्वरित करण्याची मागणी केली होती. त्यानंतरही काहीच झाले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे व मुळक या दोन्ही अध्यक्षांना दिल्लीतून पाठबळ मिळाले आहे. त्यामुळे तूर्तास तरी नवे अध्यक्ष नेमण्याची शक्यता कमीच आहे.
शहरात वंजारी की गुडधे ?
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व आ. विकास ठाकरे यांनी नागपूर शहराध्यक्ष पदासाठी आ. अभिजित वंजारी यांचे नाव समोर केल्याची माहिती आहे. अध्यक्ष बदलला तरी तो आपल्याच गटाचा व्हावा, यासाठी या नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. दुसऱ्या गटाकडून नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांचे नाव समोर केले जात आहे. माजी पालकमंत्री नितीन राऊत यांनी गुडधे यांच्यासाठी जोर लावला आहे.
ग्रामीणसाठी भोयर, वसू, आष्टनकर, राय चर्चेत
जिल्हाध्यक्ष पदासाठी केदार गटाकडून सुरुवातीला जिल्हा महासचिव सूरज इटनकर यांचे नाव पुढे करण्यात आले होते. मात्र, हे नाव सध्या मागे पडले आहे. आता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर व जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वसू, उपाध्यक्ष अनिल राय यांचे नाव चर्चेत आहे. भोयर यांनी काही दिवसांपूर्वी वासनिक यांची दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली होती, हे विशेष. कोणत्याही परिस्थितीत अध्यक्ष आपल्या मर्जीतील व्हावा, यासाठी केदार गटाचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसऱ्या गटाकडून ऐनवेळी जि. प.चे माजी सदस्य बाबा आष्टनकर यांचे नाव समाेर केले जाऊ शकते.
तेली-कुणबी समीकरण महत्त्वाचे
शहर व ग्रामीण अध्यक्ष ठरविताना तेली-कुणबी जातीय समीकरणही महत्त्वाचे ठरणार आहे. शहरात तेली समाजाला प्रतिनिधित्व दिले तर ग्रामीणमध्ये कुणबी अध्यक्ष होईल. शहरात कुणबी अध्यक्ष नेमला तर ग्रामीणमध्ये तेली समाजाला प्रतिनिधित्व दिले जाईल. मात्र, काँग्रेसमध्ये कुणाला कुठले अध्यक्षपद मिळेल, हे आताच सांगणे कठीण आहे.