नागपूर : आ. विकास ठाकरे यांनी काँग्रेस शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतरही पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. त्यामुळे विरोधी गटाने पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. गेल्या आठवड्यात असंतुष्ट गटाने दिल्लीवारी करीत काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या व ठाकरे यांच्याजागी त्वरित दुसरा अध्यक्ष नेमण्याची मागणी केली.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे. यामुळे निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले कार्यकर्ते चिंतेत आहेत. गेल्या आठवड्यात माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी आ. अशोक धवड, संजय दुबे, कृष्णकुमार पांडे, प्रफुल्ल गुडधे, कमलेश समर्थ, नरेंद्र जिचकार आदींनी दिल्लीवारी करीत प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. जयपूर अधिवेशनात एक व्यक्ती एक पद च प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आ. विकास ठाकरे यांनी काँग्रेस शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, त्यानंतरही ते या पदावर कायम आहेत. आता महापालिकेच्या निवडणुका आ. ठाकरे यांच्या नेतृत्त्वात होतील, असा भ्रम पसरविला जात आहे. हे योग्य नाही, अशी तक्रार या गटाने केली.
ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या : वनवे
- काँग्रेसचे प्रदेश महासचिव तानाजी वनवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आपल्यासह काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. शहरातील एकूणच राजकीय परिस्थितीची कल्पना दिली. लवकरच नवा शहर अध्यक्ष नियुक्त केला जाईल, असे आश्वासन नेत्यांकडून आम्हाला मिळाले आहे, असा दावा वनवे यांनी केला.
काही लोक विरोधी पक्षासाठी काम करताहेत : आ. ठाकरे
- आ. विकास ठाकरे म्हणाले, जयपूर अधिवेशनाचा आधार घेत शिर्डी येथे झालेल्या प्रदेशच्या शिबिरात आपण स्वत: पुढाकार घेत शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. आताही पक्ष आदेश देईल, त्याचे पालन केले जाईल. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काही लोकांनी पक्षात गटबाजीचे चित्र निर्माण करून पक्ष कमजोर करण्याची व विरोधी पक्षाचा फायदा करून देण्याची योजना आखली आहे. मात्र, काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता त्यांचा हा बेत यशस्वी होऊ देणार नाही, असा सूचक इशाराही ठाकरे यांनी दिला.